मुंबई : पोलीस शिपाई विशाल पवार यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. पवार यांच्या हाताला फटका मारून त्यांच्या मोबाइलची चोरी आणि चोरट्यांकडून विषारी इंजेक्शन दिल्याबाबतचे कोणतेही पुरावे तपासात सापडले नाहीत. तसेच माटुंगा व शीव रेल्वे स्थानकांदरम्यान असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याशिवाय दादर व ठाणे येथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात पोलीस शिपाई विशाल पवार दिसले. त्यामुळे पवार यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या माहितीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.
रेल्वे पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पवार कामावर गेलेच नाहीत. दादर व ठाणे येथील दोन बारजवळील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये पवार दिसले. त्यामुळे कोपरी येथे रुग्णालयात पवार यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : मुंबईत येत्या ३६ तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता, आयएमडी आणि आयएनसीओआयएसचा इशारा
तपास पथकाने ठाणे- भायखळादरम्यानचे घटनेच्या दिवसाचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील सर्व चित्रण तपासले. त्यात पवार यांनी शनिवारी ठाण्यावरून सीएसएमटी लोकल पकडली. पण भायखळ्याला उतरण्याऐवजी ते दादरला उतरले. पवार दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री १२ च्या सुमारास दिसले. यावेळी त्यांनी दादर येथून मोबाइलवरून चुलत भावाशी संपर्क साधला होता. तेथून ते दोन किलोमीटर चालत परळला गेले. तेथील स्थानकावर संपूर्ण रात्र ते झोपले होते. त्यानंतर ते परळ येथून माटुंग्याला लोकलने गेले. तेथे काही वेळ घालवल्यानंतर त्यांनी लोकलने ठाणे स्थानक गाठले. त्यानंतर त्यांनी एका नातेवाईकाला ठाण्याजवळ बोलावले. घरी सकाळी साडेअकराला पोहोचल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे मृत्यूपूर्वी विशाल पवार यांनी दिलेली माहिती व तपासात निष्पन्न झालेली माहिती यात तफावत आढळून आली आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालातून पवार यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.