मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत झाडांच्या खोडावरील खिळे, जाहिरातींचे पोस्टर, तारा, मुळांशी केलेले काँक्रीटीकरण हटवण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मुंबईतील वृक्ष संपदा अधिक बहरावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविध उपक्रम हाती घेत असते. पालिकेच्या उद्यान खात्याने पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले असून अन्य हजारो झाडांचे रोपण करण्याचे नियोजन उद्यान खात्याने आखले आहे. महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १५ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेने २०२२ मध्ये प्रथमच या अभियानाला सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे बॅनर/पोस्टर्स, तारांचे जंजाळ, वृक्षांच्या मुळांशी झालेले काँक्रीटीकरण काढून टाकण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत पुरेसे मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांसह सुसज्ज पथके तैनात करण्यात येणार असून ही पथके प्रत्येक प्रशासकीय विभागातील रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे करतील.

वृक्ष संजीवनी अभियान प्रभावीपणे आणि विनाअडथळा पार पडावे, यासाठी परिरक्षण, अनुज्ञापन, विद्युत आणि रस्ते विभागांच्या समन्वयाने राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिक, पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यां तसेच इच्छुक नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि मुंबईच्या हरित वारशाच्या संवर्धनात योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. ‘वृक्ष संजीवनी अभियान २.० हे केवळ एक हरित संपदा राखण्यासाठी औपचारिक स्वच्छता अभियान नसून, वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी लोकसहभागातून उभी राहणारी ही चळवळ आहे, अशी भावना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केली.