मुंबई : मुंबईतील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात (नायर) एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्यास इच्छुक असलेल्या १७ वर्षाच्या विद्यार्थ्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. या विद्यार्थ्याला नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दुर्गम भागांच्या श्रेणीतून प्रवेश मिळालेला असताना त्याने नायर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी आग्रह केला आणि तेथे आधीच प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अधिक मिळण्याच्या कधीही न संपणाऱ्या इच्छेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने या विद्यार्थ्याला दिलासा नाकारताना केली.
याचिकाकर्त्याला आधीच एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता. तरीही त्याला त्याच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश हवा होता. त्यामुळे, याचिका करून त्याने पसंतीच्या महाविद्यालयात बदली जागा देण्याचा आग्रह धरला. परिणामी, त्याच्या याचिकेवरील सुनावणीमुळे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया गेला, असे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्याची याचिका फेटाळताना नमूद केले. एका माणसाची अधिक मिळवण्याची कधीही न संपणारी इच्छा या प्रकरणातून दिसून येते, याचिकाकर्त्याने इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य प्रवेशापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला, असे नमूद करून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली.
याचिकाकर्ता अल्पवयीन असल्याने त्याने आपल्या डॉक्टर वडिलांमार्फत ही याचिका केली होती. सध्याच्या सामाजिक स्थितीचा विचार केल्यास एमबीबीएस महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अन्य पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे दुर्दैवी चित्र आहे, परंतु सत्य स्थिती आहे. विशिष्ट महाविद्यालयातून’ एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठीची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची हताशता या प्रकरणातून स्पष्ट होत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. या पद्धतीबाबत तसेच याचिकाकर्त्याला इतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात’ आधीच प्रवेश मिळालेला असताना विशिष्ट सरकारी महाविद्यालयात’ प्रवेश मिळवण्यासाठी या न्यायालयाचा मौल्यवान न्यायालयीन वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ६६६ गुण मिळवलेल्या याचिकाकर्त्याने दुर्गम भाग श्रेणीतून खुल्या प्रवर्गातून अर्ज केला होता. परंतु, पसंतीच्या महाविद्यालायत प्रवेश न मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सदोष असल्याचा आणि नायर वैद्यकीय महाविद्यालयाने त्याला अन्याय्य पद्धतीने प्रवेश नाकारल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. तोही न्यायालयाने उपरोक्त निष्कर्ष नोंदवून अमान्य केला.