मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंधेरी (पश्चिम) परिसरात २०२० मध्ये विकसित केलेल्या क्रीडा संकुलावरून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. कुणाचीही परवानगी न घेता महानगरपालिकेच्याच सहाय्यक अभियंत्याने क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टी विकसित केल्याचा आरोप करून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी गेली दोन वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या क्रीडा संकुलात पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ महानगरपालिकेवर आली असून त्याचाच भाग म्हणून क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाने आता राजकीय नेत्यांचेही लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील ओशिवरा गाव, वीरा देसाई रोड आणि कॅप्टन सामंत मार्ग जंक्शन, अंधेरी (पश्चिम) येथील ४९०८५.८० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्रीडा संकुलासाठी आरक्षित आहे. महानगरपालिकेच्या उद्यान कक्षाने या भूखंडावर २०२० मध्ये क्रीडा संकुल विकसित केले. या क्रीडा संकुलात क्रिकेट मैदान, सायकल मार्गिका, धावण्यासाठी मार्गिका, दोन टेनिस कोर्ट, एक बास्केटबॉल कोर्ट, दोन व्हॉलीबॉल कोर्ट, एक कबड्डी कोर्ट, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, खुली व्यायामशाळा, दर्शनी गॅलरी, प्रशासकीय कार्यालय इत्यादी सुविधा विकसित करण्यात आल्या.

हेही वाचा : “मोदी-शाह-शिंदेंना वेळ नसेल, तर…”; मराठा आरक्षणावर मनोज जरांगे आक्रमक, स्पष्टच म्हणाले…

या क्रीडा संकुलाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत होती. मात्र क्रीडा संकुलाचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरणही करण्यात आले. मात्र हे क्रीडा संकुल गेल्या दोन वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे आता क्रीडा संकुलात पुन्हा एकदा छोटी-मोठी दुरुस्ती, रंगरंगोटी करण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवली आहे. त्यासाठी १.५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून कंत्राटदाराला त्याचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मंजुरीनुसार २५ जानेवारी २०२३ पासून या क्रीडा संकुलात क्रिकेटचे सामने, चित्रिकरण आणि विविध शालेय स्पर्धांसाठी सशुल्क परवानगी देण्यात येत आहे, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : “मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं, सर्वांची नावं सांगणार”, ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस म्हणाले…

या क्रीडा संकुलातील क्रिकेटच्या मैदानात नवी खेळपट्टी विकसित करण्याचे काम सुरू असल्याची बाब उद्यानविद्या सहाय्यकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर चौकशी केली असता के-पश्चिम विभागातील सहाय्यक अभियंता (परीरक्षण) विभागाने उद्यान विभागाच्या निधीतून क्रीडा संकुलातील किरकोळ कामे हाती घेतल्याचे निदर्शनास आले. मात्र क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीचे काम हा विभाग करीत नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या अभिप्रायावरून स्पष्ट झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता के-पश्चिम विभागातील इमारत आणि कारखाने विभागातील प्रभारी सहाय्यक अभियंता यांनी क्रिकेटच्या खेळपट्टीचे काम करीत असल्याचे आणि या कामासाठी उद्यान विभागाची परवानगीच घेण्यात आली नसल्याचा दावा काही अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, उद्यान विभागाची परवानगी न घेताच परस्पर क्रिकेटच्या मैदानातील खेळपट्टीचे काम सुरू करण्यात आल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा : जे.जे. रुग्णालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस; डीएम न्यूरोलॉजी अभ्यासक्रमाचे प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका

महानगरपालिकेने क्रीडा संकुलात छोटी-मोठी दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे हाती घेतली आहेत. त्याचाच भाग म्हणून क्रिकेटच्या खेळपट्टीची दुरुस्ती करण्यात आली, असे संबंधित अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले. या परिसरातील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी आरक्षित भूखंडावर क्रीडा संकुल उभे राहावे यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि २०२० मध्ये हे क्रीडा संकुल उभे राहिले. मात्र ठराविक मंडळींसाठीच क्रीडा संकुल खुले झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते कधी खुले होणार, असा प्रश्न माजी नगरसेविका शाहेदा हारून खान यांनी उपस्थित केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai new sports complex at andheri need to be repaired before its inauguration as it remain closed for last 2 years mumbai print news css