मुंबई : ग्रामीण भागांतील गर्भवतींसाठी लाभदायक ठरलेली १०२ रुग्णवाहिका सेवा निधीअभावी मरणपंथाला लागली आहे. निधी नसल्याने रुग्णवाहिकांना इंधन उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंप चालकांकडून उसनवारीवर इंधन घेतले जात आहे. त्यांची उधारी देणेही शक्य होत नसल्याने पुढील काही दिवसांत ग्रामीण भागांतील ही सेवा ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गर्भवतींच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०२ वर संपर्क साधल्यानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध होते. गर्भवतींना त्यांच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात आणणे आणि प्रसूतीनंतर बाळ व बाळंतीणीला सुखरूप घरी सोडण्याची सुविधा १०२ या रुग्णवाहिकेमार्फत पुरविली जाते. सध्या राज्यामध्ये १०२ क्रमांकाच्या तीन हजारांहून अधिक रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्याच्या आकारानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात १०२ रुग्णवाहिका राज्य सरकारकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने काही महिन्यांपासून निधी न दिल्याने ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. निधी मिळत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्याकीय अधीक्षक जानेवारीपासून पेट्रोल पंप चालकांकडून उसनवारीवर रुग्णवाहिकेमध्ये पेट्रोल भरत आहेत. मार्च अखेरीस निधी येईल आणि इंधनाची उधारी देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्याकीय अधीक्षकांकडून पेट्रोल पंप मालकांना दिले होते. मात्र अनेक जिल्हा रुग्णालयांमधील पेट्रोलच्या देयकांचा खर्च हा काही लाखांच्या घरामध्ये पोहचला आहे. एप्रिलचा पहिला पंधरवडा उलटला तरी अद्याप निधी न आल्याने रुग्णवाहिकेसाठी पेट्रोल कसे उपलब्ध करायचे, तसेच उधारीवर घेतलेल्या पेट्रोलची देयके कशी द्यायची असा प्रश्न आरोग्य केंद्राच्या प्रमुखांसमोर आहे.
राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत तातडीने निधी उपलब्ध झाला नाही, तर पुढील काही दिवसांमध्ये १०२ रुग्णवाहिका पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक आणि आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सध्या १०२ रुग्णवाहिका सुरळीत सुरू आहेत. मात्र निधीअभावी थोडी अडचण निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपधारकांना पुढील काही दिवसांमध्ये देयके न मिळाल्यास इंधन मिळण्यात अडचण येऊ शकते. निधीसाठी लेखाधिकारी पाठपुरावा करत आहेत.
डॉ. युवराज करपे, सातारा जिल्हा शल्य चिकित्सक