मुंबई : वाढत्या प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त केली जात असली, तरी आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका नाही, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक १७० इतका असून, त्याच्यामध्ये मागील दोन दिवसांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील प्रदूषण हे ‘समाधानकार’ या प्रकारात मोडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुंबईमधील वाढत्या प्रदुषणाबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मुंबई महानगरपालिका या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक १७० इतका असून तो १०० पेक्षा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीकोनातून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. हवा गुणवत्ता निर्देशांक १०० पर्यंत असल्यास उत्तम, २०० पर्यंत असल्यास समाधानकारक, ३०० पर्यंत असल्यास खराब आणि ४०० पर्यंत असल्यास अतिखराब समजला जातो.
हेही वाचा : मुंबई : महिला पोलिसांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या घरात आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण हे अद्यापही ‘समाधानकारक’ या प्रकारामध्ये मोडत आहे. ‘समाधानकारक’ या प्रकारातील हवा आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक नाही. त्यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन इक्बाल सिंह चहल यांनी केले. मात्र वाढत्या प्रदुषणाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : “स्वतःला नास्तिक समजतात, मग धार्मिक सणांत काय करतायत?” जनतेच्या मनातील प्रश्नावर जावेद अख्तरांचं चोख उत्तर
प्रदुषणमुक्त मुंबई ही चळवळ बनायला हवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेली ‘स्वच्छ भारत’ ही मोहीम जशी चळवळ बनली आहे. त्याचप्रमाणे ‘प्रदुषणमुक्त मुंबई’ चळवळ होणे गरजेचे आहे. मुंबईतील १२०० शाळांमध्ये जवळपास १० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रदुषणमुक्त मुंबईचे महत्त्व पटवून देत ही मोहीम घराघरात राबवली पाहिजे. तसेच नागरिकांनीही प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या बाबी टाळयला हव्या, असेही इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.