मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) गेल्या तीन – चार वर्षांत एकही नवीन प्राणी आणलेला नाही. प्राणी आणण्यासाठी केलेली तरतुदही वाया गेली आहे. झेब्रा, आशियाई सिंह आणण्याचे पालिकेचे प्रयत्न तोकडे पडले आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे्. या प्रकल्पांतर्गत वाघ, बिबट्या, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा-१, कोल्हा, बाराशिंगा, चितळ, सांबर, आशियाई सिंह या प्राण्यांकरीता पिंजरे बांधून पूर्ण झाले आहेत. परदेशातून वा परराज्यातून आणलेले प्राणी काही पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत. आशियाई सिंह आणण्यासाठी पालिकेचे गेल्या दोन – अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत एकही नवीन प्राणी आणण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. माहिती अधिकारात ही बाब प्रशासनाने मान्य केली आहे. सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी पालिका प्रशासनाकडे माहिती अधिकारात याबाबत माहिती मागविली होती. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील सुमारे साडेसहा कोटींची तरतुदही वाया गेली आहे.

तरतूद वाया

प्राणी संग्रहालयात सन २०२० पासून एकही नवीन प्राणी आलेला नाही. त्यामुळे तेव्हापासून दरवर्षीची एक कोटीची तरतूद व गेल्या वर्षीची साडेतीन कोटींची तरतूद वाया गेली आहे. आशियाई सिंह आणण्यासाठी जुनागढ येथील साकरबाग प्राणी संग्रहालयातून दोन जोडी सिंह आणण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. प्राण्यांची देवाणघेवाण करण्याच्या तत्वानुसार या प्राणीसंग्रहालयाने त्या बदल्यात प्राणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आधी दोन जोडी ग्रॅट झेब्रा या प्राण्यांची मागणी केली होती. मात्र जिजामाता उद्यानात झेब्रा नसल्यामुळे हे प्राणी पालिकेने विकत घेण्याचे ठरवले होते. मात्र झेब्रा आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जिजामाता उद्यानात झेब्रासाठी अधिवासही तयार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. तसेच सिंह आणण्याचाही प्रयत्न मागे पडला.

हेही वाचा : मनसे उमेदवाराविरोधात ठाकरे गटाची मोहीम, ´आपली शिवडी आपला बाळा´ला, ´दहा वर्षे कुठे होता बाळा´चे प्रत्युत्तर

दरम्यान, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन प्राणी न आल्यामुळे तरतूद वाया गेलेली नाही. तर सुधारित अर्थसंकल्पात ही तरतूद अन्य कामांसाठी वळवण्यात आली आहे. परदेशी प्राण्यांसाठी करण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांचे काम रखडल्यामुळे नवीन प्राणी येऊ शकले नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे प्रकरण : काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा

प्राणीसंग्रहायलयातील सध्याचे प्राणी

प्राणी संग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरण, अजगर, तरस आणि पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.