मुंबई : मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘आपला दवाखाना’मध्ये नागरिकांना अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महापालिकेचा कल आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिका ‘आपला दवाखाना’मध्ये लवकरच फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात आहे. तूर्तास ही सुविधा तीन ते चार दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्याला मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन टप्प्याटप्याने ही सुविधा अन्य दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये सध्या फिजिओथेरपी सुविधा उपलब्ध आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही सुविधा ‘आपला दवाखाना’मध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. दरम्यान, अनेक रुग्णांना फिजिओथेरपीसाठी दररोज रुग्णालयात येणे शक्य नसते. त्यामुळे ही सुविधा त्यांच्या घराजवळ उपलब्ध करण्यात येणार आहे. फिजिओथेरपीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील एक – दोन महिन्यांमध्ये ‘आपला दवाखाना’मध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल,’ असे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : मुंबई: फलाटांचे विस्तारीकरण नोव्हेंबर अखेरीस पूर्ण
‘आपला दवाखाना’मध्ये दररोज १६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात येतात. तसेच १४७ प्रकरच्या रक्त तपासण्या करण्यात येतात. आतापर्यंत ठिकठिकाणच्या ‘आपला दवाखाना’मध्ये २० लाखांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत ‘आपला दवाखाना’ची संख्या २५० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने ठेवले आहे. अपघातग्रस्त रुग्ण, सीओपीडीसारखा दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, शारीरिक समस्या, लकवा, पार्किनसन्स, मल्टीपल स्क्लेरोसिस यांसारख्या आजाराने त्रस्त रुग्णांना फिजिओथेरपीची गरज भासते. ‘आपला दवाखाना’मध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे या रुग्णांना घराजवळच फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.