मुंबई : जुन्या इमारतींमधील रहिवाशांची गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेली बृहद्सूची (मास्टर लिस्ट) शून्यावर आणण्याचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबई मंडळाच्या १४७ सदनिका इमारत व दुरुस्ती मंडळाकडे वर्ग केल्या जाणार आहेत. २०११ पासून मास्टर लिस्ट उपलब्ध असून अद्ययावत करण्यात आलेल्या यादीत ८३२ अर्जदार होते. यापैकी ५९४ अर्जदारांना सदनिका वितरित करण्यात आल्याने आता २३८ अर्जदार सदनिकेच्या प्रतीक्षेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे वेगवेगळ्या मार्गाने १९६ सदनिका उपलब्ध आहेत. बीडीडी चाळवासीयांच्या संक्रमण शिबिरासाठी उपलब्ध केलेल्या १४७ सदनिका मास्टर लिस्टसाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल हेही त्यास अनुकूल आहेत. त्यामुळे या सदनिका उपलब्ध झाल्यावर मास्टर लिस्ट शून्य होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मास्टर लिस्टवरील रहिवाशांना किमान तीनशे चौरस फुटांचे घर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. याशिवाय मूळ घर ज्या क्षेत्रफळाचे असेल त्यापेक्षा शंभर चौरस फूट अतिरिक्त क्षेत्रफळ रेडी रेकनरच्या १२५ टक्के दराने देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. अधिकतम ७५० चौरस फूटापर्यंत सदनिका देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा : चोरलेले, हरवलेले २२ लाखांचे मोबाइल घाटकोपर पोलिसांनी मालकांना मिळवून दिले

उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्या २२५ चौरस फुटांच्या २२, ३०० चौरस फुटांच्या आठ, ३०० ते ४०० चौरस फुटांच्या ५३, ४०० ते ५०० चौरस फुटांच्या ४४, पाचशे ते सहाशे चौरस फुटांच्या २३, ६०० ते ७०० चौरस फुटांच्या ३८ तर ७०० चौरस फुटांपुढील आठ सदनिका उपलब्ध आहेत.
मास्टर लिस्टवरील २३८ मध्ये ३०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले २२१ अर्जदार आहेत. त्यांना ३०० चौरस फुटांचे घर देणे बंधनकारक आहे. त्यांना १०० चौरस फूट अधिक क्षेत्रफळ मिळू शकेल. पण त्यासाठी रेडी रेकनरच्या १२५ टक्के दर द्यावा लागेल. त्यापेक्षा नको असलेली घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी देऊन त्याबदल्यात ३०० चौरस फुटाची घरे इमारत व दुरुस्ती मंडळाकडे वर्ग करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मास्टर लिस्ट शून्य होईल असा विश्वासही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

हेही वाचा : मुंबईतील अपंगांना पालिकेकडून मदतीचा हात; लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर खरेदीसाठी अर्थसहाय्य

मास्टर लिस्ट म्हणजे काय?

जुनी इमारत कोसळल्याने वा धोकादायक झाल्याने रहिवाशांना संक्रमण शिबिरात पर्यायी सदनिका उपलब्ध करून दिली जाते. त्यावेळी त्यांची नावे मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट केली जातात. या रहिवाशांना इमारत दुरुस्ती मंडळाने पुनर्रचित केलेल्या वा विकासकांनी पुनर्विकसित केलेल्या इमारतीत उपलब्ध झालेल्या सदनिकांचे वितरण केले जाते. मात्र वर्षानुवर्षे सदनिका मिळत नसल्याने रहिवाशी हैराण झाले होते. दलालांमार्फतच या रहिवाशांना घरे मिळत होती. आता ही यापुढे ॲानलाइन सोडतीद्वारेच मास्टर लिस्टमधील सदनिकांचे वितरण होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai old buildings master list will be zero mumbai print news css