मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाचे काम सुरू असून या कामानिमित्त ब्लाॅक मालिका घेण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना प्रचंड विलंब होत आहे. प्रवाशांच्या रोजच्या प्रवासात २० ते ३० मिनिटे अधिकची भर पडत आहे. तर, या कामामुळे सीएसएमटी – भायखळादरम्यान वेगमर्यादा ताशी ३० किमी असल्याने, सुमारे ४.२५ किमी अंतर पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. हे अंतर नेहमी सुमारे ८ मिनिटांत पार होते. त्यामुळे प्रवाशांना नेहमीच्या वेळेपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून मध्य, पश्चिम रेल्वेवर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे ब्लाॅक घेण्यात येत आहे. परंतु, या ब्लाॅकमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड विलंब होत आहे. ब्लाॅक, वेगमर्यादा आणि तांत्रिक बिघाडामुळे नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब होत आहे. पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम २४, २५ जानेवारी आणि २५, २६ जानेवारी रोजी ब्लाॅक घेण्यात आला होता. यावेळी अनुक्रमे सुमारे १२७ आणि १५० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. तर, अनुक्रमे ६० आणि ९० लोकल अंशतः रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी, मुंबईच्या पश्चिम उपनगरातून शहरात आणि वसई-विरार जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. आता कर्नाक उड्डाणपुलाच्या कामामुळे ब्लाॅक सुरू आहे. या कामामुळे मार्गादरम्यान वेगमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे सीएसएमटी – भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान सर्व लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या बराच वेळ उभ्या राहतात.

मध्य रेल्वेवरील माटुंगा – दादरदरम्यान अप मार्गावरील रेल्वे रुळाला मंगळवारी सकाळी तडा गेला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना फटका बसला. लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड उशीर झाला. लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे या कालावधीत सुमारे १२ लोकल रद्द करण्यात आल्या. मंगळवारी सकाळी ९.२० सुमारास रुळाला तडा गेल्याची माहिती संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना समजली. त्यानंतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रेल्वे रुळाची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवा सुरू झाली. परंतु या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकलची वेगमर्यादा ताशी ३० किमी ठेवण्यात आली. यामुळे लोकल वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या लोकल सकाळच्या वेळी उशिराने धावत असल्याने, नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत आहे. मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

मुंबई महानगरात दररोज गर्दीचा लोंढा वाढत असून, त्यावर कोणत्याही प्रशासनाचे नियंत्रण असल्याचे दिसत नाही. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेवर प्रचंड ताण आला आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचा मृत्यू, तर अनेक प्रवासी जखमी होतात. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून ‘शून्य मृत्यू’ मोहिमेअंतर्गत कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी, निमसरकारी, महापालिका, खासगी कार्यालयांशी पत्रव्यवहार केला. याबाबत या संस्थांनी मध्य रेल्वेला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, मध्य रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे नोकरदारांना कार्यालयात वेळेवर पोहचता येणे अशक्य होत आहे.

शीव उड्डाणपुलासाठी घ्यावा लागणार ब्लाॅक

शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी ब्लाॅकचे नियोजन करण्यात येईल. परिणामी, येत्या काळात पुन्हा प्रवाशांना ब्लाॅकचा फटका बसणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai on tuesday 28th january at central and harbour railway trains delayed double time for few minutes journey mumbai print news asj