मुंबई : समाजमाध्यमांवर ग्राहकांचा शोध घेऊन गांजाची विक्री करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला नवघर पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव शुभम घाडीगांवकर असून तो मुलुंडमधील नवघर परिसरात वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वी नवघर परिसरात पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना शुभम दुचाकीवरून तेथे आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या गाडीमध्ये ४०० ग्राम गांजा सापडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता समाजमाध्यमांवर ग्राहक शोधून गांजाची विक्री करीत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुभमला गांजाचा पुरवठा करणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.