मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमधील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशातच टँकर मालक संघटनेने संप पुकारल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करणे कठिण झाले आहे. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटू लागला असून सध्या केवळ ३१ टक्के जलसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता आणि जलदगतीने होणारे बाष्पीभवन महापालिकेच्या जल विभागाच्या काळजीत भर पाडत आहे. परिणामी, मुंबईकारणांवर तीव्र पाणी संकट ओढवण्याची चिन्हे दाट होऊ लागली आहेत.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी असून सध्या धरणांमध्ये केवळ ४ लाख ५३ हजार ५५० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. झोपडपट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेली पाण्याची उधळपट्टी, अनेक ठिकणी सुरु असलेल्या पाण्याचा अमर्याद वापर, वारंवार जलवाहिन्यांतून होत असलेली गळती, चोरी आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी पुरेसा व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने संबंधित भागातील नागरिकांना बाटलीबंद पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत टँकर मालकांच्या संघटनेने संप पुकारला असून पाणीटंचाईमुळे मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच कडक उन्हामुळे जलद गतीने घटत चाललेल्या धरणांतील पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांची जलचिंता वाढवली आहे. सातही धरणांमध्ये मिळून केवळ ३१.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जरी अधिक असला, तरी नजिकच्या काळात मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ऊर्ध्व वैतरणा धरणात ३५.४८ टक्के, मोडकसागरमध्ये २२.४० टक्के, तानसामध्ये २४.८४ टक्के, मध्य वैतरणा धरणात ३७.३९ टक्के, भातसामध्ये ३०.७५ टक्के, विहारमध्ये ४२.६९ टक्के, तुळशी धरणात ४२.३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाकडून उपलब्ध झालेल्या शनिवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार सात धरणांमध्ये ४ लाख ५३ हजार ५५० दशलक्ष लिटर पाण्याचा साठा उपलब्ध आहे. धरणांमध्ये १२ एप्रिल २०२४ रोजी ३ लाख ७१ हजार ८६८ दशलक्ष लिटर, तर १२ एप्रिल २०२३ रोजी ४ लाख६८ हजार ०४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते. गतवर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये अधिक पाणी असले तरी कडक उन्हाळा आणि जलद गतीने होत असलेले बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा आटू लागला आहे.
तीन वर्षातील पाणीसाठा
वर्ष – पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
२०२५ – ४५३५५०
२०२४ – ३७१८६८
२०२३ – ४६८०४०