मुंबई : मुंबईतील ९,१११ घरांची सप्टेंबर महिन्यात विक्री झाली असून या गृहविक्रीतून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्य सरकारला ८७६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तर ऑगस्टमध्ये मुंबईतील ११,६३१ घरांची विक्री झाली होती. या गृहविक्रीतून राज्य सरकारला १,०६१ कोटी रुपये महसूल मिळाला होता. एकूणच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घर विक्रीसह महसुलातही घट झाली आहे. तर २०२४ मधील आतापर्यंतची ही सर्वात कमी घर विक्री आहे. पितृपक्षामुळे सप्टेंबरमध्ये घर विक्री कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

मागील काही वर्षांपासून मालमत्ता बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे. असे असले तरी २०२४ मधील नऊ महिन्यांच्या कालावधीत घर विक्री स्थिर असल्याचे दिसून येत आहे. घर विक्रीची संख्या १०,५०० ते १४,००० दरम्यान मर्यादित राहिली आहे. मार्चमध्ये सर्वाधिक १४ हजाराहून अधिक घरे विकली गेली होती. तर उर्वरित महिन्यांमध्ये घर विक्रीने १० हजारांचा टप्पा पार केला आहे. असे असताना सप्टेंबरमध्ये मात्र या वर्षातील सर्वात कमी घर विक्रीची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्ये ९,१११ घरांची विक्री झाली आहे. एकूणच ही घर विक्री मागील नऊ महिन्यांतील सर्वात कमी आहे. त्याचवेळी सप्टेंबरमध्ये महसुलातही बरीच घट झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी अनुक्रमे ७५० आणि ८५८ कोटी रुपये महसूल मिळाला होता. तर मार्च एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये एक हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला होता. राज्य सरकारला सप्टेंबरमध्ये मात्र केवळ ८७६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एकूणच हा महसूल जानेवारी वगळता इतर महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

हेही वाचा : Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

भारतीय मानसिकतेनुसार पितृपक्षात कोणतीही खरेदी केली जात नाही. त्यातही घर खरेदी करणे, मुद्रांक शुल्क भरणे अशा गोष्टी टाळल्या जातात. परिणामी, पितृपक्षातील १५ दिवसांच्या कालावधीत दरवर्षी घर विक्रीत घट होते. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पितृपक्षाच्या १५ दिवसांच्या काळात घर खरेदी कमी झाल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी दिली. सप्टेंबरमध्ये समाधानकारक घर विक्री झालेली नाही. असे तरी आता येत्या दोन – तीन महिन्यांच्या कालावधीत घर विक्रीत मोठी वाढ होईल, असा विश्वास बांधकाम क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. आता पितृपक्ष संपला असून आता नवरात्र, दसरा, दिवाळी आणि नाताळ असा सणांचा काळ सुरू होणार आहे. दसरा आणि दिवाळीतील पाडवा घर खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. त्या अनुषंगाने या कालावधीत घर विक्रीत मोठी वाढ होते. महत्त्वाचे म्हणजे नवरात्र, दसरा, दिवाळी, नवीन वर्ष, नाताळ या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून भरघोस सवलती दिल्या जातात. या सवलतींच्या योजनेस आता विकासकांकडून सुरुवात झाली आहे. मुंबईतील विकासकांकडून सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घर विक्रीत मोठी वाढ होईल, अशी आशा बांधकाम व्यवसायाला आहे. त्याचवेळी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचे आश्वासन बांधकाम क्षेत्राला दिले होते. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आचारसंहितेपूर्वी यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विकासकांच्या संघटनांकडून केली जात आहे. ही मागणी मान्य झाली, तर बांधकाम व्यवसायाला चालला मिळेल आणि घर विक्रीत मोठी वाढ होईल, ग्राहकांनाही दिलासा मिळेल असेही बांधकाम व्यवसायातील तज्ञांचे म्हणणे आहे.