मुंबई : राज्यातील तापमानाचा पारा सोमवारी चाळीशीपार गेलेला असतानाही मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांमध्ये मतदारांनी रांगा लावल्या होत्या. तर नवमतदारांच्या उत्साहाला उधाण आले होते. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी झाली. सकाळी साडेसहा वाजताच कार्यकर्त्यांनी चाळी व इमारतींबाहेर छोटेखानी मतदान माहिती कक्ष थाटले होते. या मतदान माहिती कक्षांवर मतदारयादी ठेवण्यात आल्या होत्या.
विविध राजकीय पक्षांच्या मतदान माहिती कक्षांभोवती संबंधित इमारत व चाळींमधील रहिवासी घोळका करीत होते. मतदान केंद्र कुठे आहे? यादी क्रमांक कोणता? याबाबत कार्यकर्ते दिवसभर मतदारांना माहिती देत होते. या मतदान माहिती कक्षांवर दिवसभर खाण्यापिण्याची रेलचेल होती. राजकीय पक्षांच्या कार्यालयातून कार्यकर्त्यांसाठी सकाळी कांदेपोहे, उपमा, समोसे, चहा, कॉफी असा नाश्ता, दुपाररी पुलाव, शाकाहारी व मांसाहारी बिर्याणी व सायंकाळच्या सुमारास पुन्हा चहा – नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा…मुंबई : मर्यादित वाहतूक सेवेमुळे मतदारांचे हाल
उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मतदान माहिती कक्षावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच कार्यकर्ते अनेक ज्येष्ठ मतदारांना खासगी वाहनाने मतदान केंद्रांपर्यंत नेऊन सोडत होते. तर काही कार्यकर्त्यांनी चाळी व इमारतींमधील रहिवाशांसाठी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी टॅक्सी व रिक्षाचीही व्यवस्था केली होती.
सकाळच्या सुमारास मतदानास मिळालेल्या थंड प्रतिसादानंतर अनेक ठिकाणी दुपारी व सायंकाळी कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली. कार्यकर्ते घरोघरी जाऊन रहिवाशांना मतदान करण्यासाठी आवाहन करीत होते. आपल्या परिचयाचे मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत की नाही? यावर कार्यकर्ते विशेष लक्ष ठेऊन होते. तसेच मतदारयादी तपासून आपल्या विभागातून स्थलांतरित झालेल्या रहिवाशांसोबत मोबाइलवरून कार्यकर्ते संपर्क साधत होते. त्यांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत होते. आपल्या विभागातून एकूण किती मतदान झाले, याची पडताळणी सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतदार यादी पाहून कार्यकर्ते करीत होते.
हेही वाचा….बीडीडीवासीय आणि वांद्रे वसाहतीतील रहिवाशांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत रंगत आहे. मुंबईतील दक्षिण, दक्षिण मध्य व उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे मशाल व धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या परिचित मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.