मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार लोकल धावत होत्या. परिमामी, अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच लोकल विलंबाने धावत होत्या. दरम्यान, गुड फ्रायडेनिमित्त अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी नव्हती. त्यामुळे या कार्यालयांतील कर्मचारी नेहमीची लोकल पकडण्यासाठी स्थानकात आले. मात्र सुट्टीकालीन वेळापत्रकामुळे नेहमीची लोकल नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली आणि अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.
मुंबई महानगरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक सेवेवर ताण पडत आहे. रेल्वे सेवेला पर्याय निर्माण करेल अशी स्वस्त, वेगवान आणि मजबूत पर्यायी वाहतूक सेवा नाही. त्यामुळे लोकलमधील गर्दीने अनेकांचे बळी घेतले आहेत. धावत्या लोकलमधून पडून, दरवाज्यावर उभे राहून बाहेरील खांबाला आपटून, रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होतो. प्रवाशांच्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन मुंबईतील प्रत्येक क्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली. मात्र करोनाकाळापासून मुंबईतील बहुसंख्य कार्यालयांमध्ये कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सुट्टीचे वेळापत्रकही बदलले आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयांनी टाळेबंदीपासून कामाच्या वेळा बदलल्याचे मध्य रेल्वेला कळवले आहे. असे असताना प्रवासी मात्शांर लोकल वेळेत चालवण्याची, रविवार किंवा सोमवार ते शनिवारदरम्यान सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार लोकल न चालवण्याची मागणी करीत आहेत. परंतु मध्य रेल्वे प्रशासनाला या मागण्यांची पूर्तता करता आलेली नाही.
हेही वाचा : जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी
शुक्रवारी सकाळी ८.१४, ८.४१ आणि ९.०४ वाजता डोंबिवलीवरून सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली. वातानुकूलित लोकलऐवजी सामान्य लोकल चालवण्यात आल्या. सकाळी ८.४६ ची कल्याण – सीएसएमटी अर्धजलद लोकल रद्द केल्याने मुलुंड, विक्रोळी येथे थांबलेल्या प्रवाशांचे हाल झाले. या बदलामुळे सकाळी इच्छितस्थळी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
हेही वाचा : सुधारित मतदार यादीची प्रतीक्षाच, लोकसभेनंतरच अधिसभा निवडणुकीची शक्यता
मध्य रेल्वेवरील ‘रविवारी वेळापत्रक’ किंवा ‘सुट्टीकालीन वेळापत्रक’ बदलण्यासाठी प्रयत्नशील असून, कोणता तोडगा काढता आल्यास, तत्काळ राबवू असे मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये सांगितले होते. मात्र, चार महिने उलटून गेले तरी, यावर कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकल खोळंबा, गर्दीमय प्रवास प्रवाशांना करावा लागत आहे.