मुंबई : काही दिवसांपासून मुंबईतील वातावरण खराब होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. धुळ, धुलीकण, धुरके यामुळे वातावरणाची पातळी खराब झाल्याने मुंबई महानगरपालिकेनेही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. मात्र ढासळत्या वातावरणामुळे मुंबईकर सर्दी आणि घशाच्या खवखवीने त्रस्त झाले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वातावरणातील बदलांमुळे मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदुषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे मुंबईमध्ये सर्दी व घशाच्या खवखवीने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नाक, कान, घसा रुग्णालयामध्ये घशाची खवखव व सर्दीचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा : धारावीमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; अल्पवयीन आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मागील २० ते २५ दिवसांमध्ये ही वाढ झाली असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपीका राणा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जे.जे. रुग्णालयामध्येही मागील १० ते १५ दिवसांमध्ये सर्दी आणि घशाच्या खवखवीने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जे.जे. रुग्णालयामध्येही सर्दी व घशाच्या खवखवीच्या रुग्णांची संख्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढली असल्याचे जे.जे. रुग्णालयातील जनऔषध वैद्यक विभागाचे पथकप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.