मुंबई : ग्राहकांना आणि विकासकांना रेरा कायद्याबाबत पडणाऱ्या प्रश्न, येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी महारेराने समुपदेशन सेवा सुरू केली असून त्याचा लाभ ग्राहक आणि विकासक मोठ्या संख्येने घेत आहेत. त्यांच्यासाठी समुपदेशन फायदेशीर ठरताना दिसत आहे. महिन्याला ३०० ते ३५० जण या सेवेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
नोंदणीकृत विकासकांना आणि ग्राहकांना रेरा कायद्याबाबत, प्रकल्पाबाबत अनेक प्रश्न असतात, अनेक अडचणी असतात. त्या सोडविण्यासाठी महारेराने फेब्रुवारीत समुपदेशनाची सेवा सुरु केली. महारेराच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुख्यालयातील चौथ्या मजल्यावर यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेत तेथे ग्राहक आणि विकासकांचे समुपदेशन करण्यात येते. तेथे दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते ग्राहक, विकासकांचे समुपदेशन करतात. फेब्रुवारीत ही सेवा सुरू झाली तेव्हा पहिले एक-दोन महिने १०० ते १५० जण या सेवेचा लाभ घेते होते. आता मात्र महिन्याला ३०० ते ३५० जण त्याचा लाभ घेत आहेत.
हेही वाचा : IND Vs NZ Semi Final: आता ‘नॉकआऊट’ सामना; वानखेडेवर काय आहे भारताचा जय-पराजयाचा इतिहास?
या सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ७० ते ७५ टक्के ग्राहक असतात तर २५ ते ३० टक्के विकासक असतात. घर नोंदणीनंतर ठरलेल्या कालावधीत ताबा मिळाला नाही, घराची गुणवत्ता बरोबर नाही, प्रकल्प होण्यात अडचणी आहेत याबाबत काय करायचे ? महारेराकडे याबाबत कशी दाद मागायची, त्यासाठी अर्ज कसा करायचा, समक्ष अर्ज आणून द्यायचा की ऑनलाईन केला तरी चालतो, याबाबत कसा दिलासा मिळू शकतो, असे प्रश्न घेऊन अनेक घर खरेदीदार येतात. महारेराकडूनच याबाबत मार्गदर्शन मिळत असल्याने ग्राहक समाधानी आणि अश्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे.