मुंबई : महत्त्वाचे दाखले, ओळखपत्र प्रमाणपत्रासारखी आवश्यक कागदपत्रे माफक दरात उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने आपलं सरकार सेवा केंद्र सुरू केले. परंतु, या सेवा केंद्रात नागरिकांची लूट सुरू असून कोट्यवधींचा घोटाळा केला जात आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयानेही या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती देंवेद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या विशेष खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, खंडपीठाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. तसेच, राज्य़ सरकारला प्रतित्रापत्राद्वारे तीन आठवड्यात या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जन्म, मृत्यू आणि जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे माफक दराने सहज उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने राज्यभरात ठिकठिकाणी `आपलं सरकार सेवा केंद्र’ सुरु केली. या सेवेच्या शासन निर्णयानुसार, २० ते २५ रुपये सेवाशुल्क घेणे अपेक्षित असतानाही अनेक केंद्रांवर नागरिकांकडून प्रति व्यक्तीमागे ३०० ते ५०० रुपये आकारले जातात. राज्यातील अनेक केंद्रांचा विचार करता हा घोटाळा कोट्यवधींचा घरात असल्याचा दावा करणारी जनहित याचिका रत्नागिरी जिल्ह्यातील अनिकेत जाधव यांनी वकील सोनाली जाधव यांच्यामार्फत केला आहे.

हेही वाचा : अटल सेतूवरून लवकरच बेस्ट बसप्रवास? कोकण भवन वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हाया अटल सेतू मार्ग

राज्य सरकारच्या २००८ आणि २०१८ च्या शासननिर्णयानुसार, किमान सेवाशुल्क घेण्याबाबतचे दरपत्रक या सेवा केंदावर लावणे आवश्यक आहे. मात्र, कुठेही हे दरपत्रक लावलेले दिसून येत नाही. त्यामुळे, एका दाखल्यासाठी अथवा प्रमाणपत्रासाठी किमान २० ते २५ रुपये दर निश्चित करण्यात आलेले असताना त्यासाठी ३०० ते ५०० रुपये आकारले जातात. एखाद्याने यासंदर्भात पावतीची मागणी केली तर त्याला २५ रुपयांची पावती दिली जाते, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याच्याशी संबंधित एक चित्रफितही याचिकाकर्त्यांनी याचिकेसह जोडली आहे. दुसरे म्हणजे, कार्यान्वित केंद्रांचा पत्ता सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. तो नसण्याबाबतही याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा : मॉरिस नरोन्हाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध? पूर्ववैमनस्यातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

त्यामुळे, राज्यातील सर्व सेवा केंद्राची पाहणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे आदेश देण्यात यावे. अतिरिक्त दर आकारणारे या केंद्र चालकांचे परवाने रद्द करावे, शासननिर्णयानुसार, केंद्रावर सरकारने निश्चित केलेले दरपत्रक लावण्यात यावेत, समाजमाध्यामांमार्फत जाहिरात करून योग्य दरपत्रकाची माहिती द्यावी, याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी, तसेच, या तक्रारींचे ४८ तासात निराकरण होईल, अशी सुविधा उपलब्ध करावी, अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai petition filed in high court for crores of rupees fraud in aaple sarkar seva kendra mumbai print news css