मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहरापट्टीशी साधर्म्य असलेला विजय माने याच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत कोणताही दिलासा देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. त्यानंतर, माने याच्याकडून याचिका मागे घेण्यात आली. माने याच्याकडून हेतुत: मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन केली जात आहे, असे पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. नुकताच ठार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यासह माने याने आक्षेपार्ह पद्धतीने काढलेले छायाचित्रही अतिरिक्त सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात सादर केले.
एका कार्यक्रमातील या छायाचित्रात मोहोळ हा खुर्चीवर बसला असून माने त्याच्या शेजारी स्वीय सचिवासारखा उभा असल्याचे दिसत आहे. माने हा मुख्यमंत्र्यांची वेशभूषा करून फिरत असतो आणि मुख्यमंत्री असल्याचे भासवत असतो, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या म्हणण्याची दखल घेतली. तसेच, या पार्श्वभूमीवर माने याला कोणताही दिलासा देण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी, याचिका मागे घेणार की ती फेटाळून लावू, अशी विचारणा माने याच्या वकिलांना केली. त्यानंतर, माने याने याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली. त्यास न्यायालयाने परवानगी दिली.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांसारखी वेशभूषा करणाऱ्या तोतयाच्या विरोधात गुन्हा दाखल; समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहरापट्टीशी साधर्म्य असलेला माने त्यांच्यासारखीच वेशभूषा करून फिरत असतो. माने याचे मोहोळ यांच्यासह काढलेले छायाचित्र समाजमाध्यमातून सर्वदूर झाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पुणे शहर गुन्हे शाखेने कलम ४१९ (फसवणूक), कलम ४६९ (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम ५०० (बदनामी, अब्रू नुकसानी) अंतर्गंत माने याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, पोलिसांनी आपल्याविरोधात केलेली कारवाई घाईघाईत, चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता.