मुंबईः कांदिवली पश्चिम येथील छोट्या खोलीमध्ये मेफेड्रॉन (एमडी) बनवण्याचा कारखाना उभारणाऱ्या आरोपीसह दोघांना अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले. याप्रकरणी सव्वाकोटी रुपयांचे एमडी, एमडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य पोलिसांनी जप्त केले. आरोपींविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्रार इब्राहिम शेख (३०) व नूर आलम मोहम्मद आलम चौधरी (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मालवणी पोलीस ठाण्याच्या दक्षता पथकाने ५ जानेवारी रोजी शेखला अटक केली होती. त्याच्याकडून १ ग्रॅम एम. डी. व १०० थीनरची बाटली जप्त करण्यात आली होती. चौकशीत जप्त करण्यात आलेले एमडी चौधरीकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारोती शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंके यांच्या पथकाने ९ जानेवारी रोजी चौधरीचा शोध घेण्यासाठी कांदिवलीतील चारकोप इस्लाम कंपाऊंड येथील खोलीत छापा मारला. त्यावेळी आरोपी नामे नूर आलम मेहबूब आलम चौधरी (२४) एम डी बनवताना साहित्यासह सापडला. त्यानंतर प्रयोगशाळेत एकूण ५०३ ग्रॅम उच्च प्रतीचा एमडी सापडला. तसेच त्या खोलीच्या झडतीमधे एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य असा एकूण एक कोटी पाच लाख ६० हजार रुपये किमातीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर बुधवारी त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोपीकडून एमडी बनवण्याची पुस्तिकाही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी आणखी आरोपींच्या सहभागाबाबत पोलिसांना संशय असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai police raided house making md drugs at home in malvani worth of crores rupees mumbai print news asj