मुंबई : शहरात ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सभा आणि प्रचारयात्रांना रंग चढलेला असताना अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिराती, पथनाट्यांचे सादरीकरण, चित्रफिती अशा पारंपरिक, आधुनिक माध्यमांचा वापरही केला जातो आहे. याशिवाय, तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅप गाण्यांची निर्मिती करण्यावर बहुतांशी उमेदवारांनी भर दिला आहे. एका रॅप गाण्यासाठी दीड ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च केला जातो आहे.
प्रचाराच्या धामधुमीत लाखो रुपये खर्च करून रॅप गाण्यांची निर्मिती केली जात आहे. रॅप गाण्यांचे लेखक, गायक, कलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ, छायाचित्रणकार अशा प्रत्येकाला वेगवेगळे मानधन आकारले जात आहे. लेखकापासून संगीतकारांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात रॅप गाण्याच्या निर्मितीचा प्रवास असल्यामुळे एका रॅप गाण्याच्या निर्मितीपासून प्रसिद्धीसाठी दीड ते अडीच लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे समजते. प्रचारासंबंधित सर्व कलाकृतींची निर्मिती करण्याची जबाबदारी काही उमेदवारांचे समाजमाध्यम समन्वयक तसेच आयटी सेल यांनी घेतली आहे. तर काहींनी प्रचारासंबंधित कलाकृतींचे एकत्रित पॅकेज हे खासगी निर्मिती संस्थांना (पीआर एजन्सीज) दिले आहे. निर्मिती संस्थांकडून अवघ्या एका कलाकृतीसाठी लाखो रुपये आकारले जात असल्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
हेही वाचा : मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष टीकास्त्र
विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे थेट नाव घेऊन खिल्ली उडवणे, एकमेकांच्या कामाची व कारकिर्दीची गाण्याच्या स्वरूपात तुलना करणे, उमेदवाराकडून स्वत:च्याच ध्येयधोरणांचा प्रचार करणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणे यासाठी रॅप गाण्यांचा अचूक वापर करून घेतला आहे. रॅप संगीत तरुणाईला अधिक आवडत असल्याने त्यापध्दतीने एकमेकांवर शाब्दिक टीकेची जुगलबंदी असलेली रॅप गाणी सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
बोलीभाषेतून रील्स
बदलत्या काळानुसार सतत स्मार्टफोनवर असलेल्या तरुण मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाश टाकणाऱ्या ध्वनीचित्रफिती तयार करून त्या समाजमाध्यमांवर व्हायरल केल्या जात आहेत. तसेच पॉडकास्ट, रील्स व मजेशीर तसेच खोचक टीका करणाऱ्या मीम्सनेही समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. या रील्ससाठी संबंधित मतदारसंघातील कलाकारांची निवड करून बोलीभाषेत हे रील्स बनवण्यावर अधिक भर दिला जात आहे.