मुंबई : संपूर्ण फेब्रुवारी महिना तापमानाचा पारा चढाच राहिल्यामुळे मुंबईकरांना पहाटेचा गारवा देखील अनुभवता आला नाही. महिन्यातील काही दिवस सोडले तर किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना पहाटे अल्हाददायक वातावरण अनुभवता येईल.

मुंबई व परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा जाणवत आहे. दिवसा आणि रात्रीचे तापमानही जास्त होते. यामुळे पहाटेचा गारवा नाहीसा झाला होता. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात मुंबईचे कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले. परिणामी, दिवसभर उकाडा आणि उन्हाच्या तड्याख्याचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्यातही काही दिवस गारवा अनुभवता आला. त्यानंतर कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात वाढ झाली. सध्या शहरात दिवसा उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. तर, रात्री उकाडा जाणवत आहे. दर दोन दिवसांनी कमाल आणि किमान तापमानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना त्रास होताना दिसत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कालावधीत किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. यामुळे मुंबईकरांना गारव्याचा सुखद अनुभव घेता येईल. मात्र, दुपारी काही प्रमाणात उन्हाच्या तप्त झळा सहन कराव्या लागतील.

मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी अधूनमधून काही अंशांनी वाढ होईल. उष्ण व दमट हवामान असेल. यामुळे उकाडा सहन करावा लागेल. याचबरोबर काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांसाठी मार्च महिना उकाड्याचा ठरणार आहे.

फेब्रुवारी महिना ठरला १२५ वर्षांतील सर्वाधिक उष्ण महिना

देशभरात फेब्रुवारी महिना सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला. १९०१ पासून यंदाचा २०२५ चा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण महिना ठरला आहे. मागील १२५ वर्षांत यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात विक्रमी उष्णतेची नोंद झाली आहे. जानेवारी महिना देखील सर्वाधिक उष्ण महिना होता. मात्र जानेवारी २०२४ मध्ये सर्वाधिक तापमान होते. जानेवारी २०२५ मध्ये देशाचे सरासरी तापमान १८.९८ अंश सेल्सिअस होते, जे १९०१ नंतरचे या महिन्यातील तिसरे सर्वोच्च तापमान होते.

Story img Loader