मुंबई : मुंबईतील भायखळा, दादर परिसरात बुधवारी पहाटे पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गुरुवारपासून पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईतील भायखळा, दादर परिसरात पूर्वमोसमी पावसाने बुधवारी पहाटे हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम उपनगरातील वांद्रे, अंधेरी आणि बोरिवली परिसरातही पावसाचा शिडकावा झाला. मागील काही दिवस उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३४.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गुरुवारपासून रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच हवामान विभागाने राज्यातील इतर भागातही चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने मुंबईतही पूर्वमोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात घट होऊन मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका हाईल. दरम्यान, मोसमी वाऱ्यांनी बुधवारी वाटचाल केलेली नाही. त्यामुळे मोसमी वाऱ्यांची सीमा गोवा भागात कायम होती. मोसमी वाऱ्यांसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसांत मोसमी वारे राज्यातील काही भाग व्यापतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.