मुंबई : रस्त्यावर कुठेही थुंकण्याची मुंबईकरांची सवय काही केल्या सुटत नाही हे पुन्हा एकदा आकडेवारीवारीवरूनही स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेने नेमलेल्या क्लीन अप मार्शलनी गेल्या ११ महिन्यांत जेवढ्या प्रकरणात दंड वसूल केला त्यापैकी ४४ टक्के प्रकरणे ही थुंकण्याशी संबंधित होती. तब्बल ६२ हजारांहून अधिक मुंबईकराना रस्त्यावर थुंकताना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

रस्त्यावर थुंकू नये असे कितीही फलक लावण्यात आले तरी मुंबईत कुठे ना कुठे थुंकणारे महाभाग दिसतातच. गुटखा, पान खाऊन थुंकणारे किंवा असेच थुंकणारे पादचारी, वाहनचालक सर्रास सर्वत्र दिसतात. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या, रस्त्यावर घाण करणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मुंबई महापालिकेने नेमलेल्या क्लीन मार्शलचा या थुंकणाऱ्यांशीच जास्त संबंध येतो. महापालिकेने एप्रिल २०२४ पासून मुंबईत पुन्हा एकदा क्लीन अप मार्शलची नेमणूक केली आहे. गेल्या ११ महिन्यांत क्लीन अप मार्शलनी संपूर्ण मुंबईतून दीड लाख लोकांवर दंडात्मक कारवाई केली. यापैकी तब्ब्ल ६२ हजार ८९२ नागरिकांना रस्त्यावर थुंकल्यामुळे पकडण्यात आले होते. दंड केलेल्यांमध्ये थुकणाऱ्यांचीच संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. या नागरिकांकडून ११ महिन्यांत १ कोटी २५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याखालोखल रस्त्यावर कचरा टाकला म्हणून दंडात्मक कारवाई केलेल्यांची संख्या ३२ हजार आहे. तर सर्वाधिक दंड बंगला स्वरूपात घर असलेल्यानी आपल्या घराचा परिसर स्वच्छ न ठेवल्यामुळे त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने एप्रिल २०२४ मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० क्लीन अप मार्शल याप्रमाणे संपूर्ण मुंबईसाठी मार्शल नेमले आहेत. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्यावर स्नान करणे, मलमूत्र विसर्जन करणे अशा प्रत्येक चुकांसाठी हे क्लीन अप मार्शल नागरिकांकडून २०० रुपये ते एक हजार रुपये दंड वसूल करतात व त्यांचे प्रबोधनही करतात. वसूल केलेल्या दंडापैकी ५० टक्के रक्कम क्लीन अप मार्शलचा पुरवठा करणाऱ्या संस्थेला तर ५० टक्के रक्कम पालिकेला मिळते.

पालिकेने सर्वप्रथम २००८ मध्ये क्लीन अप मार्शलची नेमणूक केली होती. मार्शलबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्यामुळे पालिकेने २०११ मध्ये त्यांची सेवा बंद केली. मग २०१६ मध्ये पुन्हा एकदा क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या होत्या. मार्शल हे विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तसेच पैसे उकळण्याच्या, दादागिरी करण्याच्या तक्रारीही केल्या जात होत्या. त्यानंतर गेल्यावर्षी क्लीनअप मार्शलसाठी कडक नियमावली तयार करून पुन्हा एकदा मार्शल नेमण्यात आले आहेत.

कोणत्या चुकासाठी किती नागरिकांना दंड

थुंकणे – ६२,८९२ – १,२५,७८ – ४०० रुपये

रस्त्यावर कचरा टाकणे – ३२,८५७ – ६५,७१,२०० रुपये

बंगल्याचा परिसर स्वच्छ न ठेवणे – १४,०१२ – १,४०,१२,००० रुपये

अशी आहे दंडात्मक रक्कम

रस्त्यावर कचरा टाकणे – २०० रुपये

रस्त्यावर थुंकणे – २०० रुपये

रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करणे – २०० रुपये

रस्त्यावर गाड्या धुणे – १००० रुपये

रस्त्यावर प्राणी पक्षाना खाऊ घालणे – ५०० रुपये

Story img Loader