मुंबई: फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेल्या एका आरोपीला पायधुनी पोलिसांनी तब्बल ३३ वर्षांनी पुण्यातील मुंडवा येथून अटक केली. पवन मोदी असे या आरोपीचे नाव असून तो खार परिसरातील वास्तव्याला होता.
पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९९० मध्ये पवन मोदी यांनी एका व्यक्तीची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात त्याच्या विरोधात खटला सुरू होता. मात्र अनेक वर्षे हा आरोपी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. पायधुनी पोलीस तेव्हापासून या आरोपीचा शोध घेत होते. मात्र हा आरोपी नाव बदलून राहात होता. राहण्याची ठिकाणे तो बदलत होता. त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता.
हेही वाचा : मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी सहा विशेष गाड्या
काही दिवसांपासून हा आरोपी पुणे परिसरात राहत असल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाल यांना मिळाली. पायधुनी पोलिसांनी तत्काळ पुण्यातील मुंडवा येथून या आरोपीला अटक केली.