मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस आधी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची घोषणा केली असून नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी ३००-४००पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कोकणातील प्राचीन शिवमंदिरात जायचे कसे असा प्रश्न अनेक शिवभक्तांना पडला आहे. परिणामी, मुंबईस्थित कोकणवासी आणि शिवभक्तांना रेल्वेने कोकणात जाणे अवघड बनले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळांचे महत्त्व वाढत आहे. तेथे भेटी देणाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याकडे सरकारचा कल असून त्यासाठी प्रचंड निधी खर्च करण्यात येत आहे. तसेच या पर्यटनस्थळांची, धार्मिक स्थळांची जाहिरातही करण्यात येत आहे. मात्र पर्यटक आणि भाविकांना कोकणातील पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळी झटपट पोहोचता यावे याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील अनेक प्राचीन शिव मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविक जातात. मात्र मध्य आणि कोकण रेल्वेने महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी विशेष रेल्वेगाडीची घोषणा केल्याने शिवभक्त, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मुंबई : मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम शैलभित्ती स्थापित

दरवर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा शुक्रवार, ८ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील हरिहरेश्वर (श्रीवर्धन), विरेश्वर (महाड), देवाचा डोंगर (खेड), वेळणेश्वर (गुहागर), मार्लेश्वर (देवरुख – संगमेश्वर), कर्णेश्वर (संगमेश्वर), कुणकेश्वर (देवगड) आणि अन्य प्राचीन शिव मंदिरांत मोठ्या संख्येने भाविक जातात. मुंबईत स्थायिक झालेले अनेक नागरिक यानिमित्त आपल्या मूळ गावी जातात. मात्र मध्य आणि कोकण रेल्वेने विशेष रेल्वेगाडी चालवण्याची घोषणा उशिरा केल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महाशिवरात्र शुक्रवारी असून त्याला जोडून शनिवार – रविवारची सुट्टी आल्याने अनेकांनी कोकणात जाण्याचे बेत आखले आहेत परंतु, मध्य आणि कोकण रेल्वेने शेवटच्या क्षणी केवळ एक दिवस आधी विशेष गाड्यांची घोषणा केल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे.

हेही वाचा : जाळ्यात अडकून १३८ कासवांचा मृत्यू, पोटात आढळली १०० हून अधिक अंडी

७ मार्च ते १० मार्च २०२४ पर्यंत मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भलीमोठी प्रतीक्षा यादी लागलेली आहे. कोकणकन्या एक्सप्रेसला स्लीपर क्लासला असलेली ४०० ची प्रतीक्षा यादी ही अनावर गर्दीची निदर्शक आहे. तसेच, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा लागून आलेल्या सुट्टीमुळे पुढील दोन दिवसही रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होणार यात शंका नाही. त्यामुळे एक आठवडा आधी विशेष रेल्वेगाडी चालवण्याची घोषणा करणे अपेक्षित होते. मात्र मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाचा नियोजन शून्य कारभाराचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागणार आहेत.

जयवंत दरेकर, संस्थापक अध्यक्ष, कोकण विकास समिती

प्रवाशांच्या सोयीसाठी, होळी व विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. ८ मार्चपासून विशेष रेल्वेगाड्या सुरू होत आहेत.

डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai railway administration special train for konkan on mahashivratri mumbai print news css