मुंबई : राजकीय रणधुमाळीत कलासक्त राजकारणी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कलाप्रेमाची प्रचिती युवा कलाकारांनी नुकतीच अनुभवली. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शीवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर ‘गंधर्व कलामंच’ या संस्थेतर्फे ‘अभिजात मराठी’ या विषयावर पथनाट्य व पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले. पथनाट्य व पोवाड्याचे शब्द कानी पडताच राज ठाकरे यांनी ‘गंधर्व कलामंच’च्या युवा कलाकारांना घरी बोलावून त्यांचे कौतुक केले. या अनपेक्षित भेटीमुळे कलाकार भारावून गेले.
मुंबईतील युवक व युवतींनी एकत्र येऊन ७ जानेवारी २०१८ रोजी ‘गंधर्व कलामंच’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना केली. नाविन्यपूर्ण प्रायोगिक नाटकांची निर्मिती करीत विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे ही संस्था आयोजन करीत असते. यंदा संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त ६ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘वर्षे सात, प्रयोग अभिजात’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘गंधर्व कलामहोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत गुरुवार, ९ जानेवारी रोजी ‘अभिजात मराठी’ या विषयावर आधारित पथनाट्य व पोवाड्याचे माटुंगा, भायखळा आणि त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शीवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर सादरीकरण करण्यात आले. पथनाट्य व पोवाड्याचे शब्द कानी पडताच राज ठाकरे यांनी ‘गंधर्व कलामंच’च्या युवा कलाकारांना घरी बोलावून घेतले आणि कलाकारांचे भरभरून कौतुक केले. तसेच संस्था कशी स्थापन झाली, स्वरूप काय, उपक्रम व कार्यक्रम कोणते, मराठी भाषा व नाटकासाठी कसे काम करता आदी विविध प्रश्न विचारत मनमोकळा संवादही साधला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच दादरमधील श्री शिवाजी नाट्य मंदिर येथे रविवार, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मराठीतील सात दिग्गज लेखकांच्या सात वेगवेगळ्या कथांवर आधारित द्विपात्री सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमाने ‘गंधर्व कलामहोत्सव २०२५’चा समारोप होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे राज ठाकरे यांना युवा कलाकारांनी निमंत्रणही दिले.
हेही वाचा : कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
‘आम्ही अभिजात मराठी भाषेवर आधारित पथनाट्य व पोवाड्याचे सादरीकरण करीत होतो. तेव्हा पथनाट्य व पोवाड्याचे शब्द कानी पडताच राज ठाकरे यांनी आम्हाला घरात बोलावून घेतले आणि आपुलकीने संवाद साधला. ही भेट आमच्यासाठी अनपेक्षित व स्वप्नवत असून कलेवर निरंतर प्रेम करणारा कलासक्त राजकारणी आम्ही अनुभवला’, अशी भावना ‘गंधर्व कलामंच’चा संस्थापक निनाद कदम याने व्यक्त केली.