मुंबई: ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी पालिका प्रशासनाने आता तीन वेगवेगळ्या निविदा मागवण्याचे ठरवले आहे. आधीच्या कंत्राटदाराने पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पालिकेने गाळ काढण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत तर ऐतिहासिक रामकुंड पुनरुज्जिवित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतगर्त येणाऱ्या हार्बर इंजिनिअरींग विभागाला काम देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरवस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी प्रारंभी कंत्राटातील अटीनुसार हस्तचलित यंत्रणा उभी करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने २४ जून रोजी एक्सकॅव्हेटर संयंत्र बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. त्यामुळे पायऱ्यांचे नुकसान झाले होते. या प्रकरणानंतर कंत्राटदाराकडून काम काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून बाणगंगा तलावाचे काम ठप्प झाले होते.

हेही वाचा : मुंबई: पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक

आता पालिका प्रशासनाने या कामासाठी एकच कंत्राटदार नेमण्याऐवजी वेगवेगळे कंत्राटदार नेमण्याचे ठरवले आहे. त्यात तलावातील गाळ काढण्यासाठी, पुरातत्त्व विभागाशी संबंधित कामांसाठी आणि अन्य कामांसाठी एक कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. तसेच रामकुंड पुनरुज्जिवित करण्यासाठी हार्बर इंजिनिअरींग विभागाची नियुक्ती करण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी १ कोटी २० लाखांचा खर्च अपेक्षित असून त्याकरीता निविदा मागवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रामकुंडासाठी हार्बर इंजिनिअरींग

बाणगंगा तलाव पुनरुज्जिवन प्रकल्पांतर्गत खोदकाम करताना ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या अकराव्या शतकातील रामकुंडाचा शोध ऑक्टोबर २०२३ मध्ये लागला होता. हे रामकुंड पुनरुज्जीवित करून त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यात येणार आहे. बाणगंगा ते अरबी समुद्र असा या रामकुंडाचा मार्ग आहे. त्यामुळे या कामासाठी बऱ्याच परवानगी लागणार असून हे काम विशेष स्वरुपाचे आहे. त्यामुळे या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या हार्बर इंजिनिअरींग विभागाला देण्यात येणार आहे. या कामासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा : मुंबई: विभाग स्तरावरील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी घेतलेल्या मोबाईल ॲपला अभियंत्यांचा विरोध, ॲप न वापरण्याचे संघटनेचे आवाहन

प्रकल्पासाठी पालिकेचा निधी नाही

बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी एकूण दहा ते बारा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी या आधी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून येणार होता. मात्र आता पंधराव्या वित्त आयोगाने तलावांच्या पुनरुज्जीवन कामासाठी दिलेल्या निधीतून प्रकल्पाची कामे केली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या कामासाठी पालिकेचा निधी वापरावा लागणार नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai ramkund pwd harbor engineering help for restoration of banganga tank mumbai print news css