मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईतील चार आरटीओ कार्यालयात २.५४ लाख वाहनांची नोंदणी झाली असून मुंबईतील एकूण वाहनांची संख्या ४६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. एप्रिल २०२४ च्या अखेरपर्यंत ही आकडेवारी ४७ लाखांपार होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, भविष्यात मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होऊन त्याचे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.
मुंबईतील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असून, त्या तुलनेत मुंबईत रस्ते, पूल, पर्यायी मार्ग उभारणीचा वेग संथगती आहे. तसेच मुंबईत विकासात्मक कामे सुरू असल्याने रस्ते आक्रसले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे बराच वेळ एकाच ठिकाणी खोळंबलेल्या वाहनांतून धूर बाहेर पडतो आणि तो प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरतो. हा धूर मानवी आरोग्यासही घातक ठरत आहे.
हेही वाचा… १७ प्राचीन जैन मूर्तींच्या लिलावाला उच्च न्यायालयाची स्थगिती
वाहनांमुळे सर्वाधिक हवा प्रदूषण होत आहे. वाहतूक कोंडीमध्ये खोळंबणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूराचे प्रमाण अधिक असून त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. यामुळे मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे, असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले.
हेही वाचा… लांबपल्ल्यांच्या रेल्वेत सापडली ६० लाखांची रोकड
चारचाकी सर्वाधिक
नुकताच गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील चार आरटीओमध्ये १ ते ९ एप्रिल या कालावधीत आठ हजारांहून अधिक वाहनांची नोंद झाली. सर्वाधिक चारचाकी वाहनांची नोंद मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये झाली. वाढत्या उष्णतेत गारेगार, आरामदायी प्रवास व्हावा, यासाठी चारचाकी वाहन खरेदी करण्यात येत आहे. तसेच एका कुटुंबात दोन ते तीन वाहने खरेदी करण्याकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या घनतेमध्ये मुंबई इतर शहरांच्या तुलनेत आघाडीवर आहे. मुंबईत प्रति किमी रस्त्यावर २,३०० वाहने असून वाहनांची संख्या गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी, तर १० वर्षांच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. चेन्नईत १,७६२ प्रति किमी वाहने, कोलकाता १,२८३ वाहने, बेंगळुरू १,१३४ वाहने आणि दिल्ली २६१ वाहने आहेत.