मुंबई : प्रत्येक रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांच्या हक्काचे ठिकाण असणाऱ्या मध्य मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसह रवींद्र नाट्य मंदिरच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानासह उभ्या राहिलेल्या या नूतनी वास्तूचे शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे.
पु .ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिककार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमींच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळणार असून उपजत कला गुण असलेल्या कलाकारांसाठीही विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन दशकांपूर्वी बांधलेली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाची वास्तू ऑक्टोबर २०२३ मध्ये नूतनीकरणासाठी बंद करण्यात आली, मात्र लांबलेला पाऊस आणि कामातील छोट्या – मोठ्या बारकाव्यांमुळे नाट्यगृह सुरू करण्याचे लांबणीवर गेले. अखेर आता या संकुलाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यामुळे कलाकार तसेच रसिकप्रेक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रदर्शन व तालीम दालने; प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलातील रवींद्र नाट्य मंदिरात कलाकारांसाठी २ लघु नाट्यगृह, ५ प्रदर्शन दालने आणि १५ तालीम दालने उपलब्ध आहेत. तसेच भव्य खुला रंगमंच, आभासी चित्रीकरण कक्ष, ध्वनी संकलन कक्ष, ध्वनिमुद्रण व ध्वनीरोपण कक्ष अशा काही अतिरिक्त सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच नाटक आणि मराठी चित्रपट या दोन्हींसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक ध्वनीव्यवस्था व अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. तसेच कला सादरीकरण, कलाशिक्षण, कला आस्वादन, कलासंवर्धन आणि कलाविषयक रोजगार निर्मिती आदी नानाविविध सुविधा अकादमीत एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. विशेष बाब म्हणजे कला क्षेत्रातील वेगवेगळे २० प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.