मुंबई : दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला असून या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. तलावातील गाळ काढणे, पाणी स्वच्छ करणे, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित केला जाईल. तलावाकडे जाणारा रस्ता तयार करणे आणि बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेची निर्मिती अशी कामे तीन टप्प्यांत केली जातील.
मलबार हिल परिसरात वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव आणि परिसराचा जिर्णोद्धार करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पातील कामे तीन टप्प्यात करण्यात येणार आहेत. वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे. तसेच तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याचे कामही सुरू आहे. तलावाच्या आजूबाजूची अतिक्रमणे हटवून तलाव परिसरात परिक्रमा मार्ग तयार करण्यात येणार आहे.
बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण सोयी-सुविधा विकास करण्याची टप्पेनिहाय कामे सध्या प्रगतिपथावर असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. या कामासाठी एकूण १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी सहा कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात तलाव प्रवेश पायऱ्यांवरील १३ झोपड्या काढण्यात आल्या आणि त्यातील राहिवाश्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नजीकच्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. यासाठी महानगरपालिका प्रशासनाला कोणतीही नुकसानभरपाई द्यावी लागली नाही. तलावातील गाळ काढताना तळाशी, तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने गाळ काढला जात आहे, अशीही माहिती शरद उघडे यांनी दिली.
तीन टप्प्यात होणार पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण
पहिल्या टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचा दर्शनी भागाची एकसमान पद्धतीने रंगरंगोटी, रामकुंडाचे पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा आणि बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्रदरम्यान विस्तृत मार्गिका बनविणे, सार्वजनिक जागा निर्माण करणे, डॉ. भगवानलाल इंद्रजीत मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अधिकारी मनोज जेऊरकर यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन पुढील वर्षी पूर्ण करण्यात येणार असून तलावाचे खोलीकरण आणि दीपस्तंभ पुनरुज्जीवन अशी कामे करण्यात येणार आहेत.
मंदिरांचे स्थळ
● तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ आहेत. तसेच तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर, बजरंग आखाडा, वाळुकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध मंदिरे आहेत.
● पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या तलावाचे महत्त्व लक्षात घेता देश-विदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देत असतात.
● ११व्या शतकातील पौराणिक संदर्भांमध्ये या तलावाची नोंद आढळते.