मुंबई : कोलकाता येथे झालेल्या निवासी डॉक्टरसंदर्भातील दुर्दैवी घटनेमुळे देशभरातील निवासी डाॅक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच सुरक्षेच्या मुद्द्यावर निवासी डॉक्टर आक्रमक झाले आहेत. केंद्रीय आरोग्य संरक्षण कायदा बनवण्याच्या मागणीसाठी ‘मार्ड’कडून आज दुपारी १ वाजता आझाद मैदानात आंदोनल करण्यात येणार आहे. या आंदोलनात निवासी डॉक्टरांसह, बंधपत्रित डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर, आंतरवासिता विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
केंद्रीय आरोग्य संरक्षण कायदा बनवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली आहे. आज दुपारी १ वाजता आझाद मैदानात जोरदार आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय मार्डकडून सर्व डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून जवळपास सहा हजार बंधपत्रित डॉक्टर व आतंरवासिता विद्यार्थी संपात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये केद्रीय मार्डबरोबरच बीएमसी मार्ड, आयएमए, आयएमए जेडीएन, अस्मी या संघटनांशी संलग्न डॉक्टरही सहभागी होणार आहेत. हे सर्व डॉक्टर आझाद मैदानामध्ये दुपारी १ वाजता आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. आझाद मैदानात आंदोलन करण्यापूर्वी केईएम, नायर, शीव, कूपर आणि जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालय परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा : धारावीतील पाच इमारतींच्या हस्तांतरात अडचणी; ‘डीआरपी’कडून ६४२ कोटी मिळण्याची हमी द्यावी, म्हाडाची भूमिका
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूत त्यांच्या मागण्याबाबात केंद्रीय गृहमंत्री व आरोग्य मंत्रयांना पत्र लिहून त्यावर लवकरच चर्चा करू असे आश्वासन दिले.
खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवा होणार ठप्प
‘मार्ड’ने पुकारलेल्या संपाला आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न असलेले सर्व डॉक्टर आरोग्य सेवा बंद ठेवणार आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा, अपघात विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याबरोबरच शस्त्रक्रिया रद्द करण्यात येणार आहेत. हे सर्व डॉक्टर खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देतात. त्यामुळे ‘मार्ड’च्या संपाचा परिणाम शनिवारी देशभरातील खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवेवर होणार असून, खासगी रुग्णालयातील सेवाही ठप्प होणार आहे.