मुंबई : महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाच्या हद्दीतील मानखुर्द परिसरात पसरलेला कचरा, चिखल तुडवत आणि डबकी चुकवत नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. शीव पनवेल महामार्गावरील सेवा रस्त्यालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गुरुवारी सकाळी जेमतेम पडलेल्या पावसामुळेही रेल्वे स्थानकानजीकचा परिसर जलमय झाला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द परिसरातील नागरिक अनेक गैरसोयींचा सामना करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. वृद्ध, नोकरदार व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. वारंवार तक्रारी करूनही अद्यापही समस्या मार्गी लावण्यात पालिकेला यश आलेले नाही. परिसरात विविध कामांसाठी सातत्याने रस्ता खोदला जातो. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्यरीत्या डागडुजी केली जात नाही. परिणामी, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कायम रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. अद्यापही पुरेशा प्रमाणात कचरापेट्यांची सोय या परिसरात करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : शिखर बँक गैरव्यवहार प्रकरण : प्रकरण बंद करण्याच्या अहवालाबाबत मुंबई पोलीस- ईडी पुन्हा परस्परविरोधी भूमिकेत
काही महिन्यांपूर्वी पालिकेच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मानखुर्द टी जंक्शन परिसरात पाहणी केली होती. त्यावेळी तेथील स्वच्छता कामातील कुचराईबाबत संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर परिसर स्वच्छ झाला होता. मात्र, शीव पनवेल सेवा रस्त्यालगतच्या अस्वच्छतेबाबत तोडगा काढण्यात पालिका अपयशी ठरली आहे. पावसामुळे कचरापेट्यांच्या आसपासचा कचरा वाहून मुख्य रस्त्यावर येतो. रस्त्यांची दुरवस्था, साचलेला कचरा अशातच पडणाऱ्या पावसामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना चालण्यासाठीही चांगला रस्ताच उरला नसून त्यांना घाणीतून पायपीट करावी लागत आहे.
हेही वाचा : कोकणातील रेल्वेगाड्यांचे दोन डबे वाढवले
अनेक वर्षांपासून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. मात्र, वारंवार तक्रारी करूनही आजतागायत हा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि गैरसोय लक्षात घेता पालिकेने तात्काळ समस्येची दखल घेऊन परिसर स्वच्छ करावा. तसेच, पुन्हा स्वच्छतेच्या तक्रारी निर्माण होणार नाही. याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवासी विकास सावंत यांनी केली आहे.