मुंबई : मुंबई महानगरपालिकेने १०० टक्के नालेसफाईचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी भूमिगत गटारांतील गाळ काढण्यात आला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली भूमिगत गटारे साफ झाली की नाही याची तपासणी सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. दर सहा मीटर अंतरावर असलेली ही गटारे आतून स्वच्छ झाली का, पाण्याचा प्रवाह जाऊ शकतो का हे त्यातून कळू शकणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र नाल्यातील गाळ काढल्यानंतरही मोठ्या नाल्यांमध्ये कचरा तरंगता दिसतो व नालेसफाई झालीच नसल्याची टीका होऊ लागते. मोठ्या नाल्यातील गाळ, कचरा साफ केला की नाही हे पाहता येऊ शकते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेली भूमिगत गटारे साफ झाली की नाही हे समजू शकत नाही. तसेच ही गटारे साफ केलेली नसली तर आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी साचते. रविवारी ९ जून रोजी पडलेल्या पहिल्याच पावसात मुंबईत अनेक भागात पाणी साचले होते. त्यामुळे भूमिगत गटारांमधील कचरा काढला नसल्याची बाब समोर आली होती. भूमिगत गटारे साफ झाली की नाही हे पाहण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा वापर करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक
मुंबईतील मोठ्या नाल्यांची स्वच्छता पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत केली जाते. तर लहान नाले, रस्त्यालगतच्या भूमिगत गटारांची स्वच्छता विभाग कार्यालयांमार्फत केली जाते. मुंबईत सुमारे दोन हजार किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. तितकेच म्हणजेच सुमारे २००४ किमी लांबीचे भूमिगत गटारांचे जाळे आहे. रस्त्यालगतच्या या भूमिगत गटारांना दर सहा मीटर अंतरावर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारांवर पाणी वाहून जाण्यासाठी जाळ्या लावलेल्या आहेत. या गटारांमध्ये अनेकदा कचरा जातो किंवा कचरा टाकला जातो. त्यामुळे ही गटारे तुंबलेली असतात. पावसाळ्याच्या आधी गटारांमधील कचरा साफ करावा लागतो. अन्यथा पावसाचे पाणी वाहून न गेल्यामुळे परिसरात पाणी साचते. मात्र ही प्रवेशद्वारे लहान असल्यामुळे केवळ त्याच्या आजूबाजूचाच कचरा स्वच्छ केला जातो. परंतु दोन प्रवेशद्वारांच्या मधला संपूर्ण मार्ग स्वच्छ झाला की नाही हे पाहिले जात नाही. त्यामुळे मोठे नाले साफ झाले तरी भूमिगत गटारे जर स्वच्छ नसतील तर पावसाचे पाणी नाल्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याकरीता भूमिगत गटारांमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाहणी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. मोठ्या नाल्यामधील गाळ काढला की नाही हे तपासण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्या दोन – तीन वर्षांपासून विविध तंत्रज्ञान, यंत्रणा, व्हीटीएस प्रणाली, ध्वनिचित्रफितीचे पुरावे कंत्राटदारांना तयार ठेवण्यास सांगितले होते. मात्र तशी यंत्रणा भूमिगत गटारांसाठी नसल्यामुळे सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा पर्याय पुढे आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.