मुंबई : म्हाडा कोकण मंडळाच्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील दोन हजारांहून अधिक घरे विकली जात नसल्याने मंडळाची चिंता वाढली आहे. मात्र आता म्हाडा प्राधिकरणाने विक्रीवाचून वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीसाठी नवीन धोरण जाहिर केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करत विरार-बोळींजमधील घरे विकण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. या धोरणात पाच पर्याय देण्यात आले असून या पाचही पर्यायांचा अवलंब करत घरे विकण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जाणार आहे. यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करत पाच पर्यायांच्या माध्यमातून या घरांची विक्री केली जाणार आहे.
कोकण मंडळाचा विरार-बोळींजमध्ये दहा हजार घरांचा प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पात पिण्याचा पाण्याचा प्रश्नासह अन्य काही समस्या होत्या. त्यामुळे ही घरे विकली जात नसल्याचे चित्र आहे. या घरांसाठी मंडळाने अनेकदा सोडत काढली असतानाही मोठ्या संख्येने घरे विकली जात नाहीत. त्यामुळे मंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ही घरे विकण्यासाठी मंडळाने या घरांचा समावेश प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्यमध्ये समावेश केला. त्यानंतरही ही घरे विकली जात नसल्याने मंडळाची चिंता आणखी वाढली आहे. पण आता ही चिंता दूर होण्याची शक्यता आहे. कारण म्हाडा प्राधिकरणाने राज्यभरातील विक्रीवाचून रिक्त असलेली ११ हजार १८४ घरे विकण्यासाठी नुकतेच नवीन धोरण जाहिर केले आहे. या धोरणाचा अवलंब करत विरार-बोळींजमधील घरे विकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे.
हेही वाचा : रशियन पोलिसांनी मुलाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप
विरार-बोळींजला सुर्या प्रकल्पाचे पाणी मिळू लागल्या आणि दुसरीकडे आता विक्रीवाचून रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीसाठी नवीन धोरण असल्याने कोकण मंडळाला विरार-बोळींजमधील घरे विकली जाण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यानुसार मंडळाने धोरणातील पाचही पर्यायांचा अभ्यास सुरु केली आहे. तर आता लवकरच रिक्त घरांच्या विक्रीसाठी जाहिरात वा निविदा काढत पाचही पर्यायांद्वारे घरांची विक्री केली जाणार असल्याचेही या अधिकार्याने सांगितले. तेव्हा आता या नव्या धोरणाच्या अवलंबानंतर विरार-बोळींजची घरे विकली जातात का हे लवकरच समजेल.
हेही वाचा : दलालांच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर, परीक्षा देणारे ८९ टक्के उमेदवार पात्र
तीन महिन्यात रिक्त घरांचा प्रश्न निकाली लावणार – संजीव जयस्वाल
राज्यभरात ११ हजार १८४ घरे विक्रीवाचून रिक्त असून या घरांच्या विक्री किंमत तीन हजार कोटींच्या घरात आहे. ही घरे विकली जात नसल्याने म्हाडाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आता शक्य तितक्या लवकर निविदा वा जाहिराती काढून या घरांची विक्री नवीन धोरणानुसार करण्याची सुचना करण्यात आल्याचे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले आहे. तर येत्या तीन महिन्यांत या रिक्त घरांच्या विक्रीचा प्रश्न मार्गी लावण्याचे म्हाडाचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.