मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यातील घरविक्रीत मोठी वाढ झाली आहे. मार्च महिन्यात मुंबईत घरांची विक्रमी विक्री झाली असून या महिन्यात १५ हजार ०९४ घरे विकली गेली. या घरविक्रीतून राज्य सरकारला १५४३ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत रविवारी मोठ्या संख्येने ग्राहकांनी घरांची खरेदी करून मुद्रांक शुल्काचा भरणा केला.

विक्रमी घरविक्री

मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपते आणि १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षे सुरु होते. त्यानुसार १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवीन दरही लागू होतात. रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेत ग्राहकांचा कल ३१ मार्चच्या आत घराची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरणा करण्याकडे असतो. त्यामुळेच दरवर्षी मार्चमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ होते. त्यानुसार मार्च २०२५ मध्येही घरांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. मागील दोन वर्षातील ही विक्रमी घरविक्री आहे.

सरकारी तिजोरीत १५४३ कोटी रुपये महसूल जमा

मार्च २०२३ मध्ये मुंबईतील १२ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती आणि यातून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने ११६० कोटी रुपये महसूल राज्य सरकारला मिळाला होता. तर मार्च २०२४ मध्ये १४ हजार १४९ घरांची विक्री झाली होती आणि यातून राज्य सरकारला ११२२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. मार्च २०२५ मध्ये मात्र घरविक्रीने १५ हजारांचा टप्पा पार केला. यंदा मार्चमध्ये १५ हजार ०९४ घरांची विक्री झाली. या घरविक्रीतून राज्य सरकारला विक्रमी महसूल मिळाला आहे. महसूलाची ही रक्कम १५४३ कोटी रुपयांच्या घरात आहे. दरम्यान, मार्च २०२१ आणि मार्च २०२२ मध्ये सर्वाधिक घरविक्री झाली होती. मार्च २०२१ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक १७ हजार ७२८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरे विकली गेली होती आणि यातून ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. आता २०२५ मध्ये मार्च महिन्यातील घरांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे.

दुय्यम निबंधक कार्यालय रविवारीही सुरू

आर्थिक वर्षे संपुष्टात येत असल्याने यावेळी घरांच्या विक्रीत वाढ झाली आहेच, पण त्याचवेळी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मोठ्या संख्येने ग्राहकांनी घर खरेदी केली. दरम्यान, शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस सु्ट्ट्या आल्या होत्या. त्यात घरखरेदीसाठी महत्त्वाचा असा साडेतीन मुहुर्तापैकी एक गुढीपाडव्याचा मुहुर्त रविवारी होता. त्यामुळे या काळात मुद्रांक शुल्क भरण्याकडे असलेला ग्राहकांचा कल लक्षात घेता नोंदणी व मुद्रांक विभागाने दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवून मुद्रांक शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे रविवार-सोमवारी सुट्टीचा दिवस असतानाही ग्राहकांना दस्त नोंदणी करता आली. परिणामी घरांच्या विक्रीत तसेच महसूलात मार्चमध्ये विक्रमी वाढ दिसून आली. घरांच्या या विक्रमी वाढीवर बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे.