मुंबई : विक्रोळीमधील एका शाळेत शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने शिक्षा करण्याचे निमित्त करून चार विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. विक्रोळी येथील टागोर नगरमधील मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल शाळेत हा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : मुंबई: राणीच्या बागेत पर्यटकांपाठोपाठ आता वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थ्यांचीही हजेरी
या शाळेतील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक सौरव उचाटे याने चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शिक्षा करण्याच्या नावाखाली हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करीत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर मंगळवारी पालकांनी या शिक्षकाला मारहाण केली आणि नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. याबाबत विक्रोळी पोलिसांनी पालकालाही ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.