मुंबईः कुर्ला पश्चिम येथील भंगार दुकानांना शनिवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. कुर्ला (पश्चिम), कुर्ला खाडी, इक्विनॉक्स बिल्डिंगजवळ भंगार दुकानात आग लागण्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत दुकानातील भंगार सामान मोठ्या प्रमाणात जळाले. ज्वालाग्राही वस्तूंमुळे आग काही वेळात भडकली. या आगीची माहिती मिळताच आजूबाजूची घरे, दुकाने तात्काळ रिकामी करण्यात आली.

या आगीत भंगार दुकाने जळून खाक झाली. मात्र आगीचा काळाकुट्ट धूर आणि ज्वाला या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या. दूर अंतरावरून भंगार दुकाने जळत असल्याचे दिसत होती. आग लागल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मात्र स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाचे पथकही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदतकार्य युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र भंगार सामानात लाकूड सामान, ज्वलनशील घटक असल्याने आग जास्तच भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग स्तर -२ ची असल्याचे सायंकाळी चार वाजून ४५ मिनिटांनी जाहीर केले. आगीवर सायंकाळी उशिरा नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र आग का आणि कशी काय लागली याबाबत अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस अधिकारी अधिक माहिती घेऊन तपास करीत आहेत.

Story img Loader