मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात प्रदुषण वाढत असून वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होऊ लागला आहे. श्वसन विकार झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या बाहयरुग्ण विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
मुंबईत प्रदूषण वाढत असून प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि राज्य आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना याबाबत उपाययोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. श्वसन विकार झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी जे. जे. रुग्णालयाने औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे. हा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत उपचार घेता येतील. तसेच दुपारनंतर केव्हाही रुग्णालयातील अपघात विभागात उपचार घेता येणार आहेत. स्वंतत्र श्वसन विकार कक्ष हा औषध वैद्यकशास्त्र विभाग आणि छाती व क्षयविकार विभागामार्फत संयुक्तरित्या चालविण्यात येत आहे.
हेही वाचा : ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान : उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयाची अखेरची संधी
हेही वाचा : “आपल्या प्रिय पंतप्रधान मोदींना कुणीतरी हे सांगितलं पाहिजे की…”; जातीयवादाचा आरोप करत संजय राऊतांचा हल्लाबोल
श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्यास जे.जे. रुग्णालयामध्ये एक स्वतंत्र रुग्ण कक्ष राखून ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये रुग्णांना आवश्यक असलेल्या नेब्युलायझेशन व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच या रुग्ण कक्षामध्ये येणाऱ्या रुग्णांचा दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
औषधांची कमतरता पडता कामा नये
श्वसन विकारा झालेल्या रुग्णांना औषधांची कमतरता पडता कामा नये. याबाबत संस्थास्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.