मुंबई : मुंबईत सुरू असलेली विकासकामे, वाढलेली वाहनांची संख्या यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील उड्डाणपुलाची पुनर्बांधणी आणि नवे उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून (महारेल-एआरआयडीसी) शिवडी रोड उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. नुकताच रेल्वे वाहतूक ब्लाॅक घेऊन शिवडी रोड उड्डाणपुलाच्या दोन तुळया यशस्वीरित्या उभारण्यात आल्या. त्यामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामामधील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून या पुलाचे जूनपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा महारेलचा प्रयत्न आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील शिवडी आणि काॅटन ग्रीन रेल्वे स्थानकांदरम्यान शिवडी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. चार पदरी उड्डाणपूल शिवडी – वरळी एलिव्हेटेड कनेक्टरला जोडण्यात येणार असून नुकताच आठ तुळया उभारण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित कामे सुरू आहेत. तसेच शिवडी उड्डाणपूल पूर्ण झाल्यास मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतूक सेवा सुरळीत होईल, असा विश्वास महारेलने व्यक्त केला आहे.
वर्षभरात २५ उड्डाणपूल बांधणार
महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि दळणवळण अधिक सुकर करण्यासाठी महारेलने (एमआरआयडीसी) वर्षभरात आणखी २५ उड्डाणपूल बांधण्याच्या दृष्टीने विविध योजना आखल्या आहेत. महारेलने अवघ्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात ३२ रेल्वे उड्डाणपूल बांधले आहेत. येत्या वर्षभरात आणखी २५ उड्डाणपुलांचे बांधकाम करण्याचे नियोजन महारेलने केले आहे.
राज्यातील २०० रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम
महानगरपालिकेने मुंबईतील ब्रिटिशकालीन व मोडकळीस आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीची जबाबदारी महारेलकडे सोपवली आहे. सद्यस्थितीला रे रोड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा पूल मुंबईकरांसाठी खुला करण्याचा महारेलचा मानस आहे. रे रोड उड्डाणपुलाच्या खांबी कमी करण्याच्या उद्देशाने केबल स्टेड पुलाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील वाहतूक नव्या पुलाच्या खालून जाणे शक्य होईल. तसेच, पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनांची विनाव्यत्यय ये-जा व्हावी यासाठी आवश्यक उंची ठेवण्यात आली आहे. महारेलकडून या पुलावर आकर्षित विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. नागरिकांसाठी पुलावर सेल्फी पाॅंईट देखील उभारण्यात आला आहे. दरम्यान, दादर, भायखळा, घाटकोपर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाणपुलांच्या बांधकामाला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यभरात जवळपास २०० रेल्वे उड्डाणपुलांचे काम महारेलकडे सोपविण्यात आले आहे.