मुंबई : ‘शेकाप’चे सरचिटणीस जयंत पाटील यांचे लहान बंधू अलिबागचे माजी आमदार पंडितशेठ तथा सुभाष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश कार्यक्रमावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील उपस्थित होते.
अलिबागच्या ‘शेकाप’च्या माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे पुत्र, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा बँकेचे संचालक आस्वाद पाटील, जि. प. माजी सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषदेचे ६ माजी सभापती, ७ जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक, आजी, माजी ६० सरपंच यांसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पाटील हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रायगडमध्ये पक्ष संघटनेला अधिक ताकद मिळणार आहे. पाटील यांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
अलिबाग आणि सांगोला या दोन तालुक्यांपुरते ‘शेकाप’चे गेले काही वर्षे अस्तित्व होते. विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटुंबात मतभेत झाले होते. त्याची परिणीती पंडीत पाटील यांनी पक्ष सोडण्यात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात आता ‘शेकाप’ उरला आहे.
‘काहीही परिणाम होणार नाही’
सुभाष पाटील किंवा अन्य कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्याने ‘शेकाप’वर काहीही परिणाम होणार नाही. रायगडमध्ये ‘शेकाप’ची ताकद कायम असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.