मुंबई : शीव, प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या अखत्यारीतील मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या टी ६ इमारतीतील एका गाळ्यात ठेवण्यात आलेल्या हजारो फाईल्सना वाळवी लागली आहे. उंदरांचाही सुळसुळाट झाला असून महत्वाच्या कागदपत्रांनी उंदराचे पोट भरले आहे. त्यात हजारो संक्रमण शिबिरार्थींची मूळ कागदपत्रे नष्ट झाली आहेत. दुरुस्ती मंडळाचा बेफिकीर कारभार उघड झाला आहे. तसेच संक्रमण शिबिरार्थींना पुढे कायमस्वरुपी घरे देताना त्यांची मूळ कागदपत्रे कुठून आणणार असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा अतिधोकादायक जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील हजारो मूळ भाडेकरू म्हाडाच्या विविध ठिकाणच्या संक्रमण शिबिरात राहात आहेत. संक्रमण शिबिरार्थींची सर्व कागदपत्रे दुरुस्ती मंडळ जमा करून घेते. जेणेकरुन पुढे संक्रमण शिबिरातील मूळ भाडेकरूंना पुनर्वसित इमारतीत किंवा बृहतसूचीअंतर्गत कायमस्वरूपी घरे देताना कोणताही अडथळा येऊ नये. त्यामुळे मूळ इमारत रिकामी करताना दुरुस्ती मंडळाकडे जमा केलेली कागदपत्रेच संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भवितव्य ठरवत असतात. त्या कागदपत्रांचे योग्य जतन करणे दुरुस्ती मंडळासाठी अत्यंत गरजेचे आहे. असे असताना मंडळाने हजारो भाडेकरूंची मूळ कागदपत्रे योग्य रित्या जतन करण्याऐवजी त्याच्या फाईल्स शीव, प्रतीक्षानगर येथील टी ६ संक्रमण शिबिरातील एका इमारतीच्या गाळ्यात कित्येक वर्षे रचून ठेवल्या. दोन-तीन दिवसांपूर्वी मंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी तो गाळा उघडला. त्यातील कागदपत्रे गाड्यांमध्ये भरण्यास सुरुवात करणार तोच यासंबंधीची माहिती शिवसेनेचे (ठाकरे ) माजी नगर सेवक रामदास कांबळे यांना मिळाली. कांबळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाळ्याच्या ठिकाणी धाव घेत कागदपत्रे चाळली असता ती मूळ कागदपत्रे असल्याचे लक्षात आले.

त्या गाळ्यात हजारोंच्या संख्येने फाईल्स होत्या. त्यांची दुरवस्था झाली होती. अनेक कागदपत्रांना वाळवी लागली होती तर काही फाईल्स उंदरांनी कुरतडल्या होत्या. अनेक फाईल्स फाटल्या होत्या अशी माहिती कांबळे यांनी दिली. यासंबंधी तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ती मूळ कागदपत्रे असल्याचे स्पष्ट झाले, असेही कांबळे यांनी सांगितले. त्या फाईल्सचे, कागदपत्रांचे योग्य प्रकारे जतन करण्याची मागणी कांबळे यांनी केली तर फाईल्स जतन न झाल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Story img Loader