मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लालबाग परिसरातील माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना भारतमाता परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास भोईवाडा पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली असून यामुळे लालबाग परिसरातील उत्सवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत या उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील परळ परिसरातील भारतमाता चित्रपटगृहासमोर दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त करीत अनिल कोकीळ आणि शाखा क्रमांक २०४ च्या वतीने भोईवाडा पोलीस ठाण्याकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. येथे गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार होता. मात्र पोलीस ठाण्याने या उत्सवाला परवानगी नाकारली.
चेहलम सणानिमित्त ७ सप्टेंबर रोजी या भागातून मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. परिणामी, दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली. ठाकरे गटातर्फे प्रथमच या परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी येथे दहीहंडी उत्सव साजरा केल्याची नोंद पोलीस ठाण्यात नाही, असेही ठाकरे गटाचा अर्ज फेटाळताना पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, या उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी उशिरा अर्ज नाकारल्याचे कोकीळ यांचे म्हणणे आहे. कार्यक्रमासाठी व्यासपीठ, चषक, सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी जेवण अशी सर्व तयारी झालेली असताना परवानगी नाकारल्याचे कोकीळ यांनी सांगितले.
कोकीळ यांना दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी पर्यायी ठिकाण सुचवण्यात आले आहे. मात्र तेथे भाजपतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे काळाचौकी पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती कोकिळ यांनी दिली. दरम्यान, ठाकरे गटातील लोकप्रतिनिधीनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवांना परवानगी नाकारून कोंडी करण्याचा शिंदे गटाचा डाव असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.