मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात मंगळवारी दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेने ५ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते. निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतरही ठाकरे गटाकडून आयकर विभाग व टीडीएस लॉग इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार शिंदे गटाकडून मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे. या खात्यातील ५० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या टॅन व पॅन क्रमांकावरून लॉग इन करून कोणाकडून रक्कम भरण्यात आली, याबाबत माहिती घेण्यासाठी देसाई यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

हेही वाचा : रे रोड उड्डाणपुलाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्णत्वास- सध्या ७० टक्के काम पूर्ण

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर शिंदे गटाचे किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी ३० जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार केली होती. या लेखी तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून देण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी आता प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या नावाच्या लॉग इन आयडी व पासवर्डचा गैरवापर झाला का? तो कोणी केला? कोणत्या बँक खात्यातून संबंधित टीडीएस व आयकराची रक्कम भरण्यात आली? याबाबतची पडताळणी सुरू आहे.

Story img Loader