मुंबई : मुंबई आणि परिसरातील बांधकामे आधीच कांदळवनांच्या मुळावर उठलेली असताना त्यात नाल्यांमधील गाळाची भर पडली आहे. मोठ्या नाल्यांतून उपसलेला गाळ कंत्राटदारांनी कचराभूमीपर्यंत न नेता कांदळवनातच टाकल्याचे उघडकीस आले आहे. तसेच गाळ वाहनात भरताना आणि कचराभूमीत टाकतानाची चित्रफीत आणि छायाचित्रे ४८ तासांत महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या नियमालाही हरताळ फासण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याऐवजी कंत्राटदारालाच झुकते माप दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागतात व परिसरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे महापालिकेने नदी-नाल्यांच्या साफसफाईसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. हे काम वर्षभर सुरू असते. पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि उर्वरित काळात २० टक्के अशा प्रकारे नालेसफाई केली जाते. महापालिकेने निविदा प्रक्रियेअंती नियुक्त केलेले कंत्राटदार मोठ्या नाल्यांमधील गाळ उपसण्याचे काम करीत आहेत. उपसलेला गाळ पूर्वी मुंबईतील कचराभूमीत टाकण्यात येत होता. मात्र या कचराभूमींची क्षमता संपुष्टात आल्यामुळे कंत्राटदाराला मुंबई बाहेरील कचराभूमीत गाळ टाकावा लागत आहे. निविदेतील अटी आणि शर्तीनुसार उपसलेला गाळ कुठे टाकणार याची माहिती महापालिकेला सादर करावी लागते. तसेच मुंबईबाहेरील खासगी भूखंडावर गाळ टाकण्यासाठी कंत्राटदाराला संबंधित जमीन मालकाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करावे लागते. नाल्यातून उपसलेला गाळ आणि अटी-शर्तीनुसार मुंबई बाहेरील भूखंडावर गाळ टाकतानाची छायाचित्रे आणि चित्रफित महापालिकेच्या संकेतस्थळावर ४८ तासांमध्ये टाकणे बंधनकारक आहे. मात्र गाळ उपसणे आणि कचराभूमीत टाकल्याची छायाचित्रे आणि चित्रफीत ४८ तासांनंतरही महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करूनन देण्यात आलेली नाहीत. हा प्रकार गेल्या एक-दीड महिन्यांपासून सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कंत्राटदारांनी नाल्यातून उपसलेला गाळ भलतीकडेच टाकल्याचे निदर्शनास आले आहे. निविदेमधील अटी-शर्तीनुसार गाळ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील व्हिलेज अंजूर येथील खासगी भूखंडावर टाकण्याची तयारी दर्शविली होती. प्रत्याक्षात गाळ तेथे पोहोचलाच नाही. गाळ वाहून नेणारे वाहन ठाणे-डोंबिवली रस्त्यावरील बॉम्बे ढाबा परिसरात पोहोचली आणि तेथेच कांदळवनात गाळ टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा : ध्वनिक्षेपक धर्माचा अविभाज्य भाग नाही! उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती; परवानगी नाकारणे हिताचे असल्याचे मत
तक्रारीनंतर संकेतस्थळावर चित्रफिती
कांदळवन, महामार्गालगतच्या मोकळ्या जागांवर गाळ टाकण्यात आल्याची चित्रफीत आणि छायाचित्रांसह समाजसेवक जया शेट्टी यांनी महापालिकेकडे ३ डिसेंबर २०२४ रोजी तक्रार केली. तसेच उपसलेल्या आणि कचराभूमीत टाकलेल्या गाळाची छायाचित्रे, चित्रफीत संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत गाळ कचराभूमीत टाकण्यात आल्याची छायाचित्रे आणि चित्रफिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या. यासंदर्भात शेट्टी यांनी मुंबई महापालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. – भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका