मुंबई : वाढते प्रदूषण, घरोघरी अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती, मच्छर अगरबत्ती, कापूर, धूप यांच्या ज्वलनाने घरातील प्रदूषण आदींचा वाढता वापर, पचनाशी संबंधित समस्या आणि कार्यालयीन स्थळी असलेले रासायनिक घटक आदी विविध कारणांमुळे धूम्रपान न करणाऱ्यांना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपान न करणाऱ्या ३० ते ४० वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना सतत खोकला होत असून फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान होत आहे. यारून केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच नव्हे, तर निर्व्यसनी व्यक्तीही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बळी ठरत आहेत. वाढते प्रदुषण त्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

भारतामध्ये २०२५ पर्यंत फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणात सातपटीने वाढ होण्याची भीती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधकांनी व्यक्त केली आहे. पूर्वी वृध्दांना फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र आता तरुणांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचे आढळत आहे. २० वर्षांपूर्वी फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र मागील १० ते १२ वर्षांमध्ये परिस्थिती बदलली असून कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तींनाही फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचे आढळत आहे. पूर्वी फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या १० रुग्णांमध्ये ८ जण धूम्रपान करणारे आणि दोन जण धूम्रपान न करणाऱ्यांचा समावेश होता. मात्र आता फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या १० रुग्णांपैकी ५ जण धूम्रपान करणारे आणि ५ जण धूम्रपान न करणाऱ्यांचा समावेश असल्याचे आढळत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वी ग्रामीण भागात चुलीवर जेवण बनवणाऱ्या महिलांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका होता. मात्र आता महिलांमधील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. समीर गर्दे यांनी सांगितले.

हे ही वाचा…मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मतदान सुरू; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

निरनिराळ्या कारणांमुळे घरातील प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामुळेच धूम्रपान न करणाऱ्या ४० ते ५० वयोगटातील नागरिकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग वाढत आहे. त्यास घरांतील धूर, वायू प्रदुषण कारणीभूत ठरत आहे. अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती, मच्छर अगरबत्ती, कापूर, धूप यांच्या ज्वलनाने घरातील प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे श्वसनाचे विविध आजार वाढत आहेत. घरात धूर करणाऱ्या घटकांचा वापर टाळून प्रदुषण कमी करता येऊ शकते, अशी माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ. तिरथराम कौशिक यांनी दिली.

हे ही वाचा…मुंबई : धावत्या रेल्वेत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग

खोकला झाल्यास काळजी घ्या

तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला आढळल्यास त्वरित वैद्यकिय सल्ला घ्या. खोकला क्षयरोग, दमा किंवा फुफ्फुसाचा कर्करोगास कारणीभूत ठरू शकतो. क्ष किरण तपासणीमध्ये काही दोष आढळल्यास अचूक निदानासाठी सीटी स्कॅन किंवा बायोप्सी करता येते.