मुंबई: लल्लूभाई कंपाऊंड येथे राहणारे महेश चव्हाण यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून त्यांचा भाऊ धनेश चव्हाण (४८) व मुलगा सूरज चव्हाण (१९) हे दोघे मुंब्रा येथे कामानिमित्त चालले होते. प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी बशीर अहमद या आपल्या मित्राच्या रिक्षातून ते मुंब्रा येथे जाण्यास निघाले. गॅस भरण्यासाठी त्यांनी गाडी पंपावर नेली होती. दुर्घटनेची माहिती कळताच महेश चव्हाण यांनी तातडीने दोघांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. तब्बल दोन तासांनी त्यांचा कॉल उचलण्यात आला. त्यावेळी धनेश आणि सूरज यांनी राजावाडी रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महेश चव्हाण यांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात पोहचल्यावर आपल्या भावासह मुलाचाही मृत्यू झाल्याचे त्यांना कळले.
घरातील कर्ता गमावला.
हेही वाचा : मुंबई: रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
ठाण्यातील बाळकुम येथे राहणारे पुर्णेश जाधव (४५) हे टूरिस्ट ड्रायव्हर होते. दादरहून ठाण्याला जात असताना ते सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपवर गेले. त्यापूर्वी त्यांनी घरी फोनकरून पत्नीकडे मुलांची विचारपूस केली आणि लवकरच घरी येत असल्याचे सांगून फोन ठेवला. पण पूर्णेश येण्याऐवजी त्यांच्या निधनाची बातमी घरी पोहोचली. सोमवारी मध्यरात्रीपासून रुग्णालयात थांबलेल्या पूर्णेश यांच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह पाहून धक्का बसला. गाडीचालक असलेल्या पूर्णेश यांचे कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून होते. आता त्यांच्या दोन्ही मुलांचे काय होणार, सरकारने पाच लाख रुपयांची मदत दिली आहे ती किती दिवस पुरणार, असे प्रश्न त्यांच्या कुटुंबियांसमोर उभे ठाकले आहेत. मुलांचे शिक्षण व ती स्थिरस्थावर होईपर्यंत कुटुंबाचा चरितार्थ चालेल इतकी मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.