मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात देशविदेशातील पर्यटकांवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झालेत. यामधील महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर मुंबईवरून पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठविण्याचे नियोजन गुरुवारी रात्रीच्या सुमारास राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने केले होते. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते.
जबर मानसिक धक्का
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पर्यटकांमध्ये एवढी भीती निर्माण झाली होती की, भारतीय सैन्य कोण आणि दहशतवादी कोण यामध्ये फरक समजू शकला नाही. बंदुकधारी व्यक्तीला पाहिल्यावर, पर्यटक घाबरून गेले होते. पर्यटक आक्रोश करून रडू लागले होते. परंतु, भारतीय सैन्याने आणि संबंधित प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या पर्यटकांना रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर अनेक पर्यटक हाॅटेलमध्ये अडकून राहिले होते. काश्मीरमधून बाहेर पडण्याचे मार्ग सापडत नव्हते. यावेळी राज्य सरकारने विशेष विमानाची सुविधा अडकलेल्या पर्यटकांसाठी उपलब्ध केल्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर, अनेक पर्यटक विशेष विमानाने मुंबईत येऊ लागले.
२५२ पर्यटकांची रवानगी
गुरुवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांचे विशेष विमान मुंबई विमानतळावर दाखल झाले. पहिल्या विमानामध्ये १७५ पर्यटक दाखल झाले. त्यानंतर दुसरे विमानाचे आगमन मुंबई विमानतळावर झाले. या विमानात ७७ पर्यटक होते. अशा एकूण २५२ पर्यटकांना मुंबई विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, परतलेल्या २५२ पर्यटकांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. पर्यटकांना धीर देत मुंबईवरून पुढील प्रवासासाठी त्यांनी माहिती दिली. प्रवासादरम्यान सर्व पर्यटकांची चहा-नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्याच्या सूचना सरनाईक यांनी संबंधितांना दिल्या. एसटी महामंडळाने केलेल्या मदतीसाठी पर्यटकांनी आभार व्यक्त केले.
५०० पर्यटक राज्यात दाखल
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या असून, दोन दिवसात सुमारे ५०० पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विशेष विमानांची व्यवस्था केली असून, त्याद्वारे १८४ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. शुक्रवारी आणखी २३२ प्रवाशांसाठी एक विशेष विमान रवाना होणार आहे.
दायित्वाचे भान
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याचे पालन एसटी महामंडळ सातत्याने करत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विना अडथळा पूर्ण करण्याचे काम एसटी चालक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहेत. करोना काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे, अतितीव्र पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षितपणे पूर्ण केली आहे.