मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्ष जाहिरनाम्यातून आश्वासनांची खैरात करीत आहेत. या पार्श्वभूमीवर स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) दक्षिण महाराष्ट्र शाखेतर्फे विद्यार्थ्यांचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक सुधारणा, महिला सुरक्षा, गोपनीयता व सायबर समस्या, पर्यावरण जागरूकता, भेदभाव विरोधी कायदा, विद्यार्थी आत्महत्या आणि मानसिक आरोग्य, बेरोजगारीची समस्या आदी विविध मुद्यांवर जाहिरनाम्यातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व निधीची पूर्तता करणे, विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पुन्हा सुरू करणे, राज्यात केंद्रीय विद्यापीठांची स्थापना, राज्यातील विविध विद्यापीठांची कार्यपद्धती सुधारून परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करणे, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळेत होणे आदी विविध मागण्या ‘एसआयओ’तर्फे करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून आणि त्यांची मते जाणून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. सध्या हा जाहीरनामा उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून दिला जात आहे आणि त्यांच्यासोबत चर्चाही केली जात आहे.
दरम्यान, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करणे, सामाजिक – आर्थिक असमानता दूर करण्यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये मुस्लिमांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात यावे, आर्थिक जोखीम व चुकीच्या ऑनलाईन संकेतस्थळांवर बंदी घालणे, सायबर सुरक्षेचे शिक्षण देणे आणि महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच पर्यावरण धोरणाची अंमलबजावणी करत शाळांमध्ये पर्यावरणस्नेही उपक्रमांसह पर्यावरण शिक्षणास समर्थन द्यावे, धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी भेदभावविरोधी कायद्याची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांना सहज मदत मिळण्यासाठी आणि विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी विविध ठिकाणी मानसिक आरोग्य केंद्र सुरू करणे, महाराष्ट्रातील रिक्त सरकारी पदे भरण्यासाठी तात्काळ कार्यवाही करून रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणे आदी विविध मागण्या ‘एसआयओ‘तर्फे जाहीरनाम्याच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.