मुंबई : प्रियकरावर दुसऱ्या मुलीने काळी जादू केली असून त्यामुळे तो फोन घेत नाही, तुला नियमित भेटण्याचे टाळतो, असे सांगून एका तांत्रिकाने सांताक्रूझमधील ३२ वर्षीय महिलेला फसवल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इंस्टाग्रामवर भेटलेल्या या तांत्रिकाने तक्रारदार महिलेच्या प्रियकरावर जादूटोणा केल्याचा दावा करून तिला विविध विधींसाठी ३.४७ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महिलेला संशय

तक्रारदार महिला ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रियकराला भेटली. तिचा प्रियकर मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून तो सध्या ठाण्यात राहतो. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा प्रियकर तिच्यासोबत असताना येणारे दूरध्वनी उचलत नव्हता. त्यामुळे त्याचे दुसऱ्या मुलीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा तक्रारदार महिलेला संशय आहे. त्यामुळे ती प्रचंड तणावाखाली होती. यातून कसे बाहेर पडता येईल, याबद्दल विचार करीत होती.

इन्स्टाग्रामवर पोस्ट पाहिली

जानेवारीमध्ये तिने एका ज्योतिष्याची इंस्टाग्रामवर पोस्ट पाहिली. त्यात फक्त २५१ रुपये शुल्क घेऊन वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध आणि करिअरबद्दल माहिती देण्याचा दावा ज्योतिष-तांत्रिकाने केला होता. प्रेमसंबंधांमुळे चिंतेत असलेल्या महिलेने त्याच्याशी संपर्क साधून प्रियकराबद्दल माहिती विचारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिने २५१ रुपयांचे शुल्क भरले आणि आपली व प्रियकराबाबत माहिती संबंधित तांत्रिकाला दिली. त्याने त्या माहितीद्वारे प्रियकरावर दुसऱ्या मुलीने जादूटोणा केला आहे, पण तिचा प्रियकर तुझ्यावरच (तक्रारदार महिलेवर) प्रेम करतो. पण काळ्याजादूमुळे तो दूर होत चाललाय, असा दावा केला.

विविध विधीच्या नावाखाली पैसा उकळले

या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने यावर काही उपाय करता येईल का अशी विचारणा केली. त्याच्यावरील जादुटोण्याचा प्रभाव दूर करावा लागेल. त्या बहाण्याने त्याने तक्रारदार महिलेकडून ५३ व्यवहारांमध्ये तीन लाख ४७ हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या तांत्रिकाने राजस्थानला मोठ्या पुजेसाठी येण्याचे सुचवले, मात्र महिलेने तिथे जाण्यास नकार दिला. तांत्रिकाने मग मुंबईत येण्याचे आश्वासन दिले, पण बराच काळ गेला तरी तो आला नाही आणि तिच्या नातेसंबंधात काहीही सुधारणा झाली नाही, यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत तक्रारदार महिलेने त्याला तीन लाख ४७ हजार रुपये दिले होते. त्यामुळे तिने याप्रकरणी आरोपी तांत्रिकाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वाकोला पोलिसांनी तक्रारीची पडताळणी करून भारतीय न्याय संहितेचे विविध कलम व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार तांत्रिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बँक व्यवहाराच्या साहाय्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.